अजित पवार अपघात प्रकरण: VSR कंपनी मालकाच्या मुलाच्या लग्नाला प्रफुल पटेल हजर होते का? रोहित पवार यांचा थेट सवाल

0
5

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी अपघाती निधनानंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात असून, या प्रकरणाला आता एक नवीन वळण लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण विधान करत माजी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री प्रफुल पटेल यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. अजित पवार यांच्या अपघातामागे ज्या VSR कंपनी चा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे, त्याच कंपनीच्या मालकाच्या मुलाच्या विवाहसोहळ्याला उपस्थित राहण्याबाबत त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

​गेल्या काही आठवड्यांपासून रोहित पवार हे अजित पवार यांच्या निधनाबाबत सातत्याने शंका उपस्थित करत आहेत. त्यांनी या प्रकरणी सखोल चौकशीची मागणी करत तपासातील विलंबावरही बोट ठेवले आहे. आता त्यांनी थेट प्रफुल पटेल यांना उद्देशून एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी विचारले आहे की, ज्या VSR कंपनी मुळे अजित पवार यांचा अपघात किंवा घातपात झाल्याचा संशय आहे, त्या कंपनीच्या मालकाचा मुलगा रोहित सिंग याच्या राजस्थान येथे पार पडलेल्या लग्न समारंभाला प्रफुल पटेल गेले होते का? जर ते या लग्नाला हजर होते, तर तिथे आणखी कोणत्या राजकीय पक्षांचे कोणते नेते उपस्थित होते, याची सविस्तर माहिती त्यांनी जनतेसमोर उघड करावी, अशी आग्रही मागणी रोहित पवार यांनी केली आहे.

​याचबरोबर, प्रफुल पटेल यांनी आपण स्वतःच्या हिताचा विचार करणारे आहात की खऱ्या अर्थाने अजित पवार यांच्यावर प्रेम करणारे आहात, हे संपूर्ण महाराष्ट्राला सिद्ध करून दाखवावे, असे आव्हानही देण्यात आले आहे. या गंभीर प्रश्नांवर स्पष्टीकरण देण्यासाठी प्रफुल पटेल यांनी उद्या तातडीने पत्रकार परिषद घ्यावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

​दरम्यान, अजित पवार यांच्या निधनानंतर रोहित पवार यांनी न्यायासाठी मोठा लढा उभारला असून, गेल्या तीन आठवड्यांत त्यांनी अनेक पत्रकार परिषदा घेऊन नव्या दाव्यांसह प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले आहे. या संपूर्ण प्रकरणाची माहिती ते विविध राजकीय नेत्यांपर्यंत पोहोचवत असून, राज्याबरोबरच देशातील अनेक वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठीही त्यांनी घेतल्या आहेत. या नव्या प्रश्नामुळे आता प्रफुल पटेल काय भूमिका मांडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.