वाहनाचे चाक डोक्यावरून गेल्याने तरूणीचा जागीच मृत्यू

0
2

मुंबई – गोवा महामार्गावरील खेड तालुक्यातील तुळशी फाटा येथे शुक्रवारी पहाटे तीन ते चार वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात घडला. अज्ञात वाहनाच्या धडकेत एका तरुणीचा मृत्यू झाला.  संबंधित वाहनाचे चाक थेट तरुणीच्या डोक्यावरून गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.

या अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. सुरुवातीला तरुणीची ओळख पटत नव्हती. ती काळ्या रंगाचा टी-शर्ट परिधान केलेली असल्याची माहिती समोर आली होती. स्थानिकांच्या मदतीने व नातेवाईकांशी संपर्क साधल्यानंतर मृत तरुणीची ओळख स्वप्नाली विजय कदम असे तिचे नाव आहे. ती विजय लक्ष्मण कदम यांची कन्या असून मूळ राहणार वावे (वाळंजवाडी) तर्फे नातू गाव येथील आहे. त्यांचे कायम वास्तव्य ठाणे येथे असल्याची माहिती मिळाली आहे.

पहाटेच्या सुमारास संबंधित तरुणी महामार्गावर कशासाठी होती, याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत.  पोलीस तपासानंतरच नेमकी परिस्थिती स्पष्ट होणार आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह पुढील तपासणीसाठी पाठवला.  अज्ञात वाहनाचा शोध सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून संबंधित वाहनचालकाचा शोध घेण्यासाठी विशेष पथक कार्यरत असल्याची माहिती मिळत आहे.