चिपळूण-तालुक्यातील आकले- तळवडेवाडी येथे शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून एका २७ वर्षीय विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना २३ डिसेंबर रोजी घडली होती. याप्रकरणी पतीसह सासू-सासरा व दोन दिरांविरुद्ध अलोरे-शिरगाव पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ,विजय भगवान मोहिते, भगवान शिवा मोहिते, कुसुम भगवान मोहिते, राजू भगवान मोहिते आणि नेताजी भगवान मोहिते (सर्व रा. आकले-तळवडेवाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत विवाहितेचे वडील नामदेव लक्ष्मण मोहिते (वय ७६, रा. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. जयश्री विजय मोहिते (वय २७) यांचा विवाह ३ जुलै २०१७ रोजी विजय मोहिते यांच्याशी झाला होता. विवाहानंतर सुमारे चार वर्षे संसार सुरळीत सुरू होता. मात्र, अपत्य न झाल्याच्या कारणावरून २०२२ पासून पती व सासरच्या मंडळींकडून त्यांना शारीरिक तसेच मानसिक त्रास दिला जात होता, असे फिर्यादीत म्हटले आहे. या छळाला कंटाळून त्यांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेनंतर तपासाअंती संबंधितांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

