चंद्रपूर जिल्ह्यातील काँग्रेसच्या गोटात मोठी खळबळ उडाली असून, पक्षातील अंतर्गत गटबाजीला कंटाळून माजी आमदार डॉ. अविनाश वारजूरकर आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. सतीश वारजूरकर यांनी भाजपची वाट धरली आहे. आज, गुरुवारी मुंबईतील भाजप कार्यालयात त्यांचा अधिकृत पक्षप्रवेश होणार आहे. चिमूर विधानसभा मतदारसंघात दबदबा असलेल्या या दोन बड्या नेत्यांनी साथ सोडणे हा काँग्रेससाठी मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.
डॉ. सतीश वारजूरकर यांनी २०१९ आणि २०२४ अशा दोन्ही विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या तिकिटावर चिमूरमधून नशीब आजमावले होते, मात्र दोन्ही वेळा त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवामागे जनमतापेक्षा पक्षातील अंतर्गत गटबाजीच अधिक कारणीभूत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. केवळ गटबाजीमुळेच काँग्रेसला चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि महापालिकेतील सत्ता गमवावी लागली, अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीतही काँग्रेसची हीच अवस्था होईल, अशी भीती वाटल्याने अखेर त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला.
या पक्षबदलाच्या हालचाली बुधवारी वेगवान झाल्या. वारजूरकर बंधूंनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी भाजप आमदार बंटी भांगडिया यांचीही उपस्थिती होती. या भेटीनंतर डॉ. सतीश वारजूरकर यांनी स्वतः आपण भाजपमध्ये प्रवेश करत असल्याची पुष्टी केली आहे. वारजूरकरांच्या या निर्णयामुळे चिमूरमधील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

