राजापूर -तालुक्यातील हातिवले येथे राज्य उत्पादन शुल्क विभाग रत्नागिरीच्या भरारी पथकाने धडक कारवाई करताना गोवा बनावटीच्या दारूची अवैध वाहतूक करणारा कंटेनर ताब्यात घेतला. कंटेनरमधील गोवा बनावटीच्या दारूचे तब्बल १३०० बॉक्स व कंटेनर असा एकूण १ कोटी ५९ लाख ६८ हजार रूपयांचा मुद्देमाल भरारी पथकाने जप्त केला आहे.
महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख, अंमलबजावणी व दक्षता संचालक प्रसाद सुर्वे, राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभागाचे विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर, राज्य उत्पादन शुल्क, रत्नागिरीच्या अधीक्षक कीर्ती शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली, मिळालेल्या माहितीनुसार मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ वरील हातिवले याठिकाणी प्रस्तावित टोलनाका परिसरात मुंबईकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक सहाचाकी कंटेनर गोवा बनावटीच्या अवैध दारूची बेकायदेशीररित्या वाहतूक करत असल्याचे समजले. यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभाग रत्नागिरीच्या पोलीस अधीक्षक कीर्ती शेडगे यांच्या मार्गदशर्नाखाली घडक कारवाई करताना हा कंटेनर गोवा बनावटीच्या दारूसह ताब्यात घेण्यात आला. या कंटेनरमधून महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेली व फक्त गोवा राज्यात विक्रीस असलेली रॉयल ब्लू माल्ट व्हिस्की या ग्रॅण्डची दारू जप्त करण्यात आली. १३०० कागदी पुठ्याचे दारूचे बॉक्स (१९२३२ ब.लि) व एक सहाचाकी पांढऱ्या रंगाचा टाटा कंपनीचा कंटेनर (नं. एम एल ०१ एडी ०१२१) असा एकूण रु.१ कोटी ५९ लाख ६८ हजार रूपयांचा (एक कोटी एकोणसाठ लाख अडसष्ठ हजार रुपये मात्र) चा मुद्देमाल गुन्हा रजि.क्र. ०६२/२०२६ नुसार नोंद करुन जप्त करण्यात आला. या गुन्ह्यातील गोवा बनावटीच्या दारूची एकूण किंमत रु.१ कोटी ३७ लाख २८ हजार एवढी आहे. या गुन्ह्यातील कंटेनर चालक गणेश कुमार पोकरराम, रा. नागणेशियान, डुढा बारमेर, राज्य राजस्थान-३४४०३५ याचे विरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे कलम ६५ (अ) (ई) व ९० नुसार वारस गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ही कार्यवाही राज्य उत्पादन शुल्क, रत्नागिरीच्या अधीक्षक कीर्ती शेडगे यांचे मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक रत्नागिरीचे निरीक्षक अमित पाडळकर, दु.निरीक्षक गणेश जाधव, सोबत जवान वैभव सोनावले, जवान व वाहनचालक मलिक थोत्रे, जवान मानस पवार, जवान विशाल भोसले, जवान निलेश तुपे व जवान सागर टिकार यांच्या पथकाने केली असून सदर गुन्ह्याचा तपास राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक रत्नागिरीचे निरीक्षक अमित पाडळकर हे करत आहेत.

