संगमेश्‍वरमध्ये बांग्लादेशी महिलेला अटक, तालुक्यातील आंबेड खुर्दमध्ये घेतला होता आश्रय

0
5

संगमेश्वर-जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात सुरक्षेच्या दृष्टीने एक अत्यंत खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. बांगलादेशातून बेकायदेशीरपणे भारतात घुसखोरी केलेल्या एका महिलेला संगमेश्वरमधील आंबेड खुर्द येथे आश्रय देण्यात आला इतकेच नव्हे, तर भारतीय प्रशासनाच्या डोळ्यात धूळफेक करून तिचे बनावट पॅनकार्ड आणि आधारकार्ड देखील तयार करण्यात आले. या गंभीर प्रकरणी संगमेश्वर पोलिसांनी ६ मार्च २०२६ रोजी रात्री उशिरा धडक कारवाई करत, संबंधित बांगलादेशी महिलेसह तिला मदत करणार्‍या तिच्या पतीवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली असून स्थानिक सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

या घटनेची सविस्तर माहिती अशी की, आंबेड खुर्द येथील मुस्लिम मोहल्ल्‌यात राहणार्‍या युसूफ महंमद सय्यद याने सिनेम युसूफ सय्यद उर्फ शांतना अहमद खान (मूळ रा. खिलगाव, जिल्हा गाजीपूर, ढाका, बांगलादेश) ही परदेशी नागरिक आहे, हे माहित असतानाही तिच्याशी लग्न केले. संशयित आरोपी युसूफने तिला केवळ आश्रयच दिला नाही, तर ती भारतीय नागरिक असल्याचे भासवण्यासाठी तिची बनावट कागदपत्रे तयार करून घेतली. या बनावट आधारकार्ड आणि पॅनकार्डच्या आधारे कॅनेरा बँकेत खाते उघडून भारतीय प्रशासकीय आणि बँकिंग व्यवस्थेची मोठी फसवणूक केल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे.
मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ६ मार्च रोजी दुपारी संगमेश्वर पोलिसांनी आंबेड खुर्द येथील संशयित पत्त्यावर छापा टाकला. यावेळी ही महिला कोणत्याही वैध कागदपत्रांशिवाय भारतात अवैधरित्या वास्तव्य करत असल्याचे पोलिसांना आढळून आले. या प्रकरणी महिला पोलीस कॉन्स्टेबल कोमल ढोले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रात्री उशिरा गुन्हा नोंदवण्यात आला. या दोन्ही संशयित आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता, पारपत्र नियम आणि परकीय नागरिक कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. थेट बांगलादेशमधील महिला कोकणात येऊन सरकारी कागदपत्रे बनवतेच कशी आणि यामागे एखादे मोठे रॅकेट कार्यरत आहे का, असा प्रश्न आता उपस्थित होत असून पोलीस त्यादिशेने अधिक तपास करत आहेत.