शक्तीपीठ महामार्गाला गती : सिंधुदुर्गसाठी धार्मिक पर्यटनाचा नवा मार्ग

0
9

सिंधुदुर्ग –  राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी पवनार (वर्धा) ते पत्रादेवी (सिंधुदुर्ग) शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाच्या कामाला वेग आला असून मार्गमोजणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या महामार्गाचा शेवट सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रादेवी येथे होणार असल्याने जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

ऑगस्ट महिन्यात सांगलीपर्यंतच्या आखणी व भूसंपादनास मंजुरी देण्यात आली होती. त्यानुसार आतापर्यंत १५० हून अधिक गावांतील जमिनीची मोजणी यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे. पहिल्या टप्प्यासाठी २०,७८७ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली असून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून तांत्रिक कामे अंतिम टप्प्यात आहेत.

हा महामार्ग वर्धा ते थेट सिंधुदुर्गातील पत्रादेवीपर्यंत जात असून राज्यातील १२ जिल्हे, ३९ तालुके आणि सुमारे ३७० गावांमधून मार्गक्रमण करणार आहे. आराखड्यातील बदलांमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातून महामार्ग वळवण्यात आला असून एकूण लांबी ४०८ किमीवरून ४४० किमी झाली आहे.

सिंधुदुर्गला धार्मिक पर्यटनाची मोठी संधी

या शक्तीपीठ महामार्गामुळे माहूर, तुळजापूर आणि कोल्हापूर या प्रमुख शक्तीपीठांसह परळी वैजनाथ, औंढा नागनाथ, पंढरपूर, नरसोबाची वाडी आदी एकूण १८ धार्मिक स्थळे परस्पर जोडली जाणार आहेत. परिणामी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रादेवी परिसर धार्मिक पर्यटनाचे महत्त्वाचे प्रवेशद्वार ठरणार असून स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे.