लोणावळा: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर गेल्या ३३ तासांपासून सुरू असलेला वाहतुकीचा खोळंबा संपतो न संपतो, तोच प्रवाशांना पुन्हा एकदा मोठ्या कोंडीचा सामना करावा लागत आहे. आडोशी बोगद्याजवळील गॅस टँकर हटवून वाहतूक सुरळीत होत असतानाच, लोणावळ्याजवळ एक सिमेंटचा कंटेनर बंद पडल्याने महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
आडोशी बोगद्याजवळ उलटलेल्या ज्वलनशील वायूच्या टँकरमुळे एक्सप्रेस-वे तब्बल ३३ तास विस्कळीत होता. यंत्रणांनी अथक परिश्रम घेऊन गुरुवारी पहाटे २ च्या सुमारास ही मार्गिका खुली केली होती. मात्र, अवघ्या काही तासांतच लोणावळ्याजवळ सिमेंट वाहून नेणारा मोठा कंटेनर तांत्रिक बिघाडामुळे रस्त्यातच बंद पडला. यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक पुन्हा मंदावली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
सलग दोन दिवस वाहतूक कोंडीत अडकलेल्या प्रवाशांना या नव्या अडथळ्यामुळे पुन्हा मनस्ताप सहन करावा लागत आहे. महामार्ग पोलीस आता हा कंटेनर क्रेनच्या साहाय्याने बाजूला करण्याचे काम करत आहेत.

