राणेंची पुन्हा एकदा विकास गर्जना; “कोकण माझा श्वास” म्हणत साधला जनतेशी संवाद

0
8

१९९० ते २०२६: सिंधुदुर्गच्या प्रगतीचा ‘राणे पॅटर्न’; दरडोई उत्पन्न २.६० लाखांवर

सी-वर्ल्ड’साठी माझी जिद्द कायम आहे…
तरुणांना कोकणातच रोजगार, उद्योजकता वाढविण्यासाठी माझे सतत प्रयत्न
३५ वर्षांच्या अतूट नात्यावर खा. नारायण राणे यांनी व्यक्त केली कृतज्ञता

आजवर कोकणची जनता माझ्या पाठीशी उभी राहिली आहे. विरोधक जरी सातत्याने विकासाला आणि मला विरोध करत असले तरीही जनतेने मात्र, मला कधीच अंतर दिले नाही. माझ्यावर १९९० पासून आजवर विश्वासच ठेवला आहे. विकास कोण करू शकतो हे जनतेला माहिती असल्यामुळे निवडणूक कोणतीही असली तरीही जनता माझ्या विकासाच्या विचारासोबत राहिली असा विश्वास माजी मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री, खासदार नारायण राणे यांनी व्यक्त केला.

खासदार राणे म्हणाले, १९९० साली कोकणच्या राजकारणात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने मी विधानसभा निवडणूक लढवली. ती निवडणूक जनतेच्या विश्वासाने जिंकली. तिथपासून आजपर्यंत नेहमीच निवडणुकीत यश मिळत गेलं.गेल्या ३५ वर्षांत कोकणच्या विकासात झालेला बदल, केलेली प्रगती लोकांसमोर आहे. १९९० पूर्वीचा सिंधुदुर्ग आणि आजचा सिंधुदुर्ग हा सर्व बदल जनतेसमोर आहे. रस्ते, पाणी, वीज मुलभूत गरजांबरोबर जिल्ह्यात शिक्षण, आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या. कोकणातील बदलेलं चित्र लोकांसमोर असल्याने जनतेची मला साथही मिळत गेली. यामुळे मला सहावेळा आमदार आणि एकवेळा खासदार म्हणून जनतेने निवडून दिले.

दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून तसे प्रयत्न करण्यात आले. आज दहावी, बारावीच्या परीक्षेत कोकणचे विद्यार्थी अव्वलस्थानी असतात हे पाहून निश्चितच मला आनंद होतो. शैक्षणिक क्षेत्रातही इंजिनिअरिंग कॉलेज, मेडिकल कॉलेज, पदवी अभ्यास या शैक्षणिक सुविधा उपलब्ध होऊ शकल्या. या जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय प्रमाणे खाजगी वैद्यकीय महाविद्यालयाच्या माध्यमातूनही सेवा उपलब्ध झाली आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेली अनेक वर्षे चौपदरी महामार्गासाठी तसेच विमानतळ व्हावा यासाठी केंद्र व राज्यसरकारकडे सातत्याने मागणी केली जात होती. केंद्र व राज्य सरकारच्या सहकार्याने चौपदरी रस्ता आणि विमानतळ दिला. विमानसेवेतही सुधारणा घडण्यासाठी आजही प्रयत्न होत आहेत. २५ हजारवर असलेले सिंधुदुर्गचे दरडोई उत्पन्न २ लाख ६० हजारावर गेले आहे.

खा.नारायण राणे यांनी पाणीटंचाईच्या मुद्दयावर बोलताना सांगितले की, ३० वर्षांपूर्वी जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई होती. मी मुख्यमंत्री असताना टँकरमुक्त सिंधुदुर्ग करण्याचा निर्धार केला आणि त्याप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेची विशेषत: महिलांची पाण्यासाठी असलेली वणवण थांबली. जिल्ह्यात मोठे, मध्यम, लहान धरणांची कामे सुरू केली. ती पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. सिंधुदुर्गातील जनतेने जी साथ दिली आहे. त्यामुळेच सिंधुदुर्गचा विकास आणि प्रगती करता आली आहे.

कोकणातील तरूण आजही शहरांकडे जात आहे. त्यांना कसे थांबवणार? याबाबत बोलताना खा. नारायण राणे म्हणाले, खरं आहे. कोकणात शिकलेला तरूण पुणे, मुंबईसारख्या शहरांकडे जात आहे. कोकणातील ग्रामीण भागातील घरेही बंद आहेत. गावातला तरूण गावातच राहिला पाहिजे. यासाठी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात स्वयंरोजगार आणि उद्योगांच्या माध्यमातून रोजगार निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आडाळी एमआयडीसीमध्ये केंद्र आणि राज्यसरकारच्या माध्यमातून उद्योगांची उभारणी केली जाणार आहे. उद्योजकांना वीज, पाणी, जमीन याची उपलब्धता करून देऊन बेरोजगारीचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्याचा प्रयत्न आहे. यापुढील काळात कोणत्याही उद्योगांना विरोध न करता कोणच्या विकासाला चालना कशी मिळेल, असे आमचे प्रयत्न राहतील.

सिंधुदुर्ग जिल्हा हा देशातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून राज्यसरकारने घोषित केला. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बाजूच्या रत्नागिरी जिल्ह्यातही अनेक पर्यटनस्थळे आहेत. या पर्यटनस्थळांच्या माध्यमातून विकास करण्याचा एका वेगळ्या मार्गाने आपण प्रयत्न करत आहोत. म्हणून सी-वर्ल्डसारखा प्रकल्प सिंधुदुर्गात निर्माण करून जगातील पर्यटकांना जिल्ह्यात आणण्याचा माझा प्रयत्न होता. परंतु, ज्यांना विकासापेक्षा विरोधच करायचा असतो त्यांनी विकासाला अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. परंतु सी-वर्ल्ड प्रकल्पासाठीचे माझे प्रयत्न सुरूच राहतील. सिंधुदुर्गात गोवा आणि सिंगापूरच्या धर्तीवर विकास प्रकल्प राबवून पर्यटन विकासाला अधिक गती देण्याचा आमचा प्रयत्न आहे. भविष्यात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र जोडणाऱ्या रेल्वेमार्गाने कोकणच्या विकासाला निश्चितपणे गती मिळणार आहे, असे खा. राणेंनी सांगितले.

जिल्हापरिषद निवडणूक पार्स्वभूमीवर बोलताना खा. राणे म्हणाले, महायुतीने जो उमेदवार दिलाय त्याच उमेदवाराच्या मी पाठीशी आहे. कोणत्याही अपक्षाला माझा पाठींबा नाही. राणे दुहेरी भूमिका घेत नाहीत. जे एकदा ठरलं त्याचीच अंमलबजावणी आम्ही करतो.

बदललेल्या निवडणुकांबद्दल खा.राणे म्हणाले, राज्यात सिंधुदुर्गने महायुतीला मोठा कौल दिला. बिनविरोध सदस्य निवडीत आमच्या जिल्ह्याने बाजी मारली आहे. या निवडणूक निकालानंतर महायुतीचे सर्वाधिक यश आपल्याला दिसेल असे ते म्हणाले.

(टीप- वरील लेख हा प्रहारचे निवासी संपादक संतोष वायंगणकर यांनी घेतलेल्या खा.नारायण राणे यांच्या खास मुलाखतीवरून घेतला आहे)