कणकवली: सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी मतदान पार पडत असतानाच, पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्ह्यातील अनेक मतदारसंघांत महायुतीच्या अधिकृत उमेदवारांविरुद्ध उभे राहिलेल्या अपक्षांबाबत बोलताना अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला. “असंख्य भागांत अपक्ष उभे करण्याची मस्ती काही लोकांनी केली आहे, पण जर ते चुकून निवडून आले तर तुमच्या भागासाठी निधी कुठून आणणार?” असा थेट सवाल राणे यांनी यावेळी उपस्थित केला. या वक्तव्यातून नितेश राणे यांनी स्वपक्षातील बंडखोरांनाही अप्रत्यक्षपणे इशारा दिला आहे.
जिल्ह्याचा विकास हा केवळ सत्तेच्या माध्यमातूनच शक्य असतो, हे अधोरेखित करताना नितेश राणे म्हणाले की, ग्रामविकास मंत्रालय किंवा राज्य मंत्रिमंडळापर्यंत पोहोचण्याची ताकद या अपक्ष उमेदवारांकडे असणार नाही. “मंत्रालयाचे दरवाजे उघडण्यासाठी आणि मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणण्यासाठी भक्कम सत्तेचा पाठिंबा लागतो. केवळ विरोधासाठी विरोध करणाऱ्या अपक्षांना निवडून देऊन मतदार आपल्या विभागाचे नुकसान करून घेणार नाहीत,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
“ज्यांचे नेतृत्व नारायण राणे करतात, तिथे संभ्रम नसतो. ज्यांना आपली राजकीय वळवळ आणि हिंमत दाखवायची आहे, त्यांचा कार्यक्रम ९ फेब्रुवारीनंतर होईल,” असा सज्जड दमही त्यांनी बंडखोरांना दिला. सिंधुदुर्गात महायुतीचा ‘बिनविरोध’ पॅटर्न राबवण्याचा प्रयत्न यशस्वी झाला असला, तरी काही जागांवर असलेल्या अपक्षांच्या आव्हानामुळे ही निवडणूक चुरशीची ठरली आहे. या इशाऱ्याचा मतदारांवर काय परिणाम होतो, हे आता निकालातूनच स्पष्ट होईल.

