मुंबई महानगरपालिकेत ‘सिंधुदुर्ग पॅटर्न’; भाजप-शिवसेना युतीकडून कोकणच्या सुपुत्रांना मानाचे स्थान

0
8

मुंबई महानगरपालिकेच्या ऐतिहासिक सभागृहात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा डंका पुन्हा एकदा मोठ्या अभिमानाने वाजला आहे. नुकत्याच पार पडलेल्या निवडीत मुंबईच्या महापौर पदी रितू तावडे आणि उपमहापौर पदी संजय घाडी यांची वर्णी लागली असून, या दोन्ही निवडींच्या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुंबईच्या राजकारणात मोठे वजन प्राप्त झाले आहे. महापौर रितू तावडे या मूळच्या मालवण तालुक्यातील पेंडूर गावच्या कन्या असून, त्यांच्या निवडीने पेंडूरसह संपूर्ण जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे. दुसरीकडे, देवगड तालुक्यातील पडेल गावचे सुपुत्र संजय घाडी यांची उपमहापौर पदी वर्णी लागल्याने जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्या महायुतीने या निवडीच्या माध्यमातून एका अर्थाने सिंधुदुर्ग जिल्ह्यालाच मुंबई महानगरपालिकेत मोठे प्रतिनिधित्व दिले असल्याचे मानले जात आहे. मुंबईच्या जडणघडणीत कोकणवासीयांचे, विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेचे मोठे योगदान राहिले आहे. या योगदानाची दखल घेत युती सरकारने दोन महत्त्वाच्या पदांवर कोकणच्या सुपुत्र-सुपुत्रीची वर्णी लावून मुंबईतील चाकरमान्यांच्या मनात अढळ स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. रितू तावडे आणि संजय घाडी यांच्या रूपाने आता मुंबईतील नागरी प्रश्नांसोबतच कोकणच्या अस्मितेचा आवाजही महापालिकेत अधिक प्रखरतेने घुमणार आहे. या निवडीमुळे केवळ मुंबईतच नव्हे, तर पेंडूर आणि पडेल या दोन्ही गावांमध्ये ग्रामस्थांनी जल्लोष साजरा केला असून, संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातून या दोन्ही नेत्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.