सामाजिक कार्यकर्त्यांची नवी आघाडी: पुणे मुंबई एक्सप्रेस वे फोरम

0
5

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर मागील आठवड्यात प्रवाशांना सलग ३२ तास अडकून पडावे लागल्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील जागरूक नागरिकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. या भीषण अनुभवानंतर शासकीय आणि प्रशासकीय यंत्रणेच्या ढिसाळ कारभाराबद्दल संताप व्यक्त करण्यासाठी ज्येष्ठ विधिज्ञ असीम सरोदे यांच्या कार्यालयात एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत एक्सप्रेसवेवरील समस्यांना वाचा फोडण्यासाठी आणि प्रशासनाला जाब विचारण्यासाठी ‘पुणे मुंबई एक्सप्रेस वे फोरम’ची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, ज्येष्ठ पत्रकार विनिता देशमुख यांची या फोरमच्या संयोजक म्हणून निवड करण्यात आली आहे.

सत्ताधारी राजकारणी केवळ राजकारणात व्यस्त असल्याने त्यांच्यावर विसंबून न राहता, जनतेचे नोकर असलेल्या जबाबदार अधिकाऱ्यांना आता थेट धारेवर धरण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला. या मोहिमेचा एक भाग म्हणून ‘पीपल्स स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम’ (P-SIT) स्थापन करण्यात आली आहे. ही समिती रस्ते विकास महामंडळ, आरटीओ, आपत्कालीन व्यवस्थापन आणि रस्ते सुरक्षा पोलीस यंत्रणेच्या अपयशाची सखोल चिकित्सा करणार आहे. रस्ते सुरक्षा आणि घातक रसायनांची हाताळणी यांसारख्या तांत्रिक विषयातील तज्ज्ञ या समितीत असतील आणि ते सरकारला या संदर्भात आवश्यक शिफारसी सादर करतील. या सत्यशोधन समितीच्या कार्यकक्षा लवकरच निश्चित केल्या जाणार आहेत.

प्रशासकीय दिरंगाईमुळे ज्या नागरिकांच्या व्हिसा अपॉईंटमेंट चुकल्या, विमान प्रवास हुकला किंवा महत्त्वाच्या कामांचे नुकसान झाले, अशा बाधितांना कायदेशीर मदत देण्याचा महत्त्वाचा निर्णयही या वेळी घेण्यात आला. नुकसान भरपाईसाठी आणि गुन्हेगारी स्वरूपाच्या तक्रारी दाखल करण्यासाठी फोरमच्या वतीने विनामूल्य कायदेशीर साहाय्य (Legal Aid) उपलब्ध करून दिले जाईल. या बैठकीला प्रसिद्ध विधीज्ञ असीम सरोदे, सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी, विजय कुंभार, अनिता गोखले-बेनिन्जर, संजय शिरोडकर आणि निवृत्त डीवायएसपी तळेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या मोहिमेत सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन या वेळी करण्यात आले आहे. याबाबतची माहिती सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून दिली आहे.