नवा राजकीय भूकंप! भाजप-राष्ट्रवादीची गुप्त युती; शिंदे सेना महायुतीतून ‘आऊट’?

0
13

रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल अधिकृतपणे जाहीर झाले असून यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने आपला दबदबा सिद्ध केला आहे. एकूण ५९ जागांपैकी २१ जागांवर विजय मिळवून शिंदे गट जिल्ह्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. इतर पक्षांच्या कामगिरीवर नजर टाकल्यास राष्ट्रवादी काँग्रेसने १६, भाजपने १५, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने ५ तर काँग्रेसने २ जागांवर यश मिळवले आहे. या निकालांमुळे जिल्ह्याचे सत्तासमीकरण पूर्णपणे बदलले असून सत्तेच्या चाव्या आता कोणाच्या हाती जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जिल्ह्यात शिंदे गटाने सर्वाधिक जागा जिंकल्या असल्या तरी बहुमतासाठी आवश्यक असलेला आकडा गाठण्यात त्यांना अपयश आले आहे. सद्यस्थितीत सर्वाधिक सदस्य असूनही सत्ता स्थापनेसाठी त्यांना इतर मित्रपक्षांच्या पाठिंब्याची नितांत गरज आहे. दुसरीकडे, जर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला, तर त्यांचे एकत्रित संख्याबळ ३१ वर पोहोचते. हे संख्याबळ सत्ता स्थापनेसाठी पुरेसे असल्याने भाजप-राष्ट्रवादी युतीची शक्यता वर्तवली जात आहे. जर ही युती प्रत्यक्षात आली, तर सर्वाधिक जागा जिंकणारा शिंदे गट विरोधी बाकावर बसण्याची शक्यता निर्माण झाली असून यामुळे जिल्ह्यातील राजकारण अधिकच रंगतदार होणार आहे.

या सर्व घडामोडींवर मंत्री भरत गोगावले यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट करताना शिवसेनेचा सत्तेवरील दावा कायम ठेवला आहे. जिल्ह्यातील विकासकामे आणि जनसंपर्कामुळेच जनतेने आम्हाला सर्वात मोठा पक्ष म्हणून कौल दिला असल्याचे त्यांनी सांगितले. निकालाबाबतची सविस्तर माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आली असून, जिल्ह्याची राजकीय परिस्थिती आणि संख्याबळ लक्षात घेऊन तेच अंतिम निर्णय घेतील, असे गोगावले यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आता सत्तेचे हे गुंतागुंतीचे समीकरण कसे सुटते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.