महायुती सरकारवर विरोधकांचा हल्लाबोल; मंत्रालयातील एसीबी कारवाईनंतर राजकीय वातावरण तापले

0
4

मुंबईतील मंत्रालय परिसरात गुरुवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या एका धडक कारवाईत अन्न आणि औषध प्रशासन विभागाचा कारकून राजेंद्र ढेरंगे याला अटक करण्यात आली आहे. तक्रारदाराच्या मेडिकल स्टोअरचा परवाना निलंबित करण्यात आला होता आणि ही निलंबनाची कारवाई रद्द करण्यासाठी ढेरंगे यांनी ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती ३५ हजार रुपये देण्याचे ठरले असता, एसीबीने मंत्रालयातच सापळा रचून ढेरंगे यांना ही रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडले. या कारवाईनंतर एसीबीच्या पथकाने आरोपीचे कार्यालय आणि निवासस्थानी झडती घेण्यास सुरुवात केली असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

या घटनेचे पडसाद राजकीय वर्तुळातही उमटले असून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्य सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. मंत्रालयात एका कॅबिनेट मंत्र्यांच्या कार्यालयाशी संबंधित असलेल्या कर्मचाऱ्याला ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत असल्याचे सांगत त्यांनी महायुती सरकारच्या काळात भ्रष्टाचार शिगेला पोहोचल्याचा आरोप केला आहे. जनतेची कामे पैशांशिवाय होत नसून मंत्रालयात खुलेआम कमिशनखोरी सुरू असल्याचा दावा सपकाळ यांनी ट्विटरच्या माध्यमातून केला आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन संबंधित मंत्र्याला पदावरून हटवावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. या कारवाईमुळे मंत्रालयातील इतर विभागांमध्येही भीतीचे वातावरण पसरले असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.