खोपोली – फाटा येथे अगरबत्ती व्यवसाय करणार्या इसमाकडे सुमारे ३ लाख २२ हजार रुपये किंमतीचा गांजा आढळून आला. पटेलनगर येथील श्रीपाद गणपत सूर्यवंशी यांचा अगरबत्तीचा व्यवसाय आहे आणि त्यांच्या घरी गांजा असलेल्याची माहिती खोपोली पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घरावर धाड टाकली असता गोणी व सीलबंद केलेली खाकी कलरची पॅकेट आढळून आली व उग्र वासाची पाने, फुलं व बिया आणि काळपट असा गांजा आढळून आला. सुमारे १५ किलो ४०० ग्रॅम एवढा वजनाचा हा गांजा असून त्याची किंमत सुमारे ३ लाख २२ हजार एवढी आहे. त्याचबरोबर एक मोबाईल वजन काटा हस्तगत करण्यात आला आहे. या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला असून उपविभागीय पोलीस अधिकारी नेहुल पाटील व खोपोली पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सखोल तपास सुरू आहे.

