दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? सुनील तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं; १० तारखेच्या बैठकीकडे राज्याचे लक्ष!

0
4

मुंबई-राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चांनी सध्या राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट करत आगामी हालचालींचे संकेत दिले आहेत.

मंत्री हसन मुश्रीफ यांनी एकत्रीकरणाबाबत केलेल्या विधानानंतर राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले होते. यावर बोलताना तटकरे यांनी स्पष्ट केले की, हसन मुश्रीफ हे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, मात्र आम्ही सर्वांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली ‘एनडीए’मध्ये सामील होण्याचा निर्णय आधीच घेतला आहे. या विषयावर सखोल चर्चा करण्यासाठी येत्या १० तारखेला मुंबईत एक महत्त्वाची बैठक होणार असून, त्याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

येत्या १० तारखेला मुंबईत मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मुंबईत येणार असून, त्यांच्या उपस्थितीत पक्षाचे सर्व प्रमुख नेते एकत्र बसून या विषयावर सविस्तर चर्चा करतील, अशी माहिती तटकरे यांनी दिली. सुनेत्रा पवार या राज्यसभेच्या सदस्य असल्याने त्यांच्या काही वैधानिक जबाबदाऱ्या आहेत, तसेच त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भेटीसाठी दिल्ली दौऱ्यावर जाण्याचीही शक्यता आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, पक्षाची पुढील दिशा काय असेल, याचा निर्णय सर्वजण मिळून घेतील असे त्यांनी नमूद केले.

विशेष म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजितदादांचा एक ‘राजकीय परिवार’ असल्याचे सांगत तटकरे यांनी विरोधकांनाही चिमटा काढला. “आमचा हा परिवार राजकीय स्वरूपाचा आहे, अन्यथा कुणीतरी यावरून पुन्हा टीका-टीप्पणी करायला मोकळे होईल,” असे म्हणत त्यांनी पक्षांतर्गत एकीवर भर दिला. एकीकडे विलीनीकरणाच्या चर्चा आणि दुसरीकडे सुनेत्रा पवार यांच्या वाढत्या राजकीय जबाबदाऱ्या, यांमुळे १० तारखेला होणारी ही बैठक राष्ट्रवादीच्या भविष्यासाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहे.