मोटार अपघातातील मृताच्या वारसांना 18 कोटी 30 लाख नुकसान भरपाई देण्याचे आदेश

0
6

कणकवली – सन 2015 साली हरकुळ ता. कणकवली येथील मूळ रहिवाशी विनोद भास्कर तेली यांच्या अपघाती मृत्यूप्रकरणी मोटार अपघातातातील मृताच्या  वारसांना व्याजासह रू. अठरा कोटी तीस लाख पंच्याऐंशी हजार नऊशे रूपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मोटार अपघातामध्ये सिंधुदुर्ग न्यायालयीन इतिहासामध्ये इतकी नुकसानभरपाई मंजूर करण्याचा आदेश पहिल्यांदा झाला आहे.

सन 2015 साली हरकुळ ता. कणकवली येथील मूळ रहिवाशी विनोद भास्कर तेली  हे मुंबईवरून आपल्या गावी येण्यास स्वतःच्या स्काला कारने निघाले असता तळेरे येथे समोरून पूर्णता विरुद्ध आणि चुकीच्या बाजूने गोवा दिशेकडून येणार्‍या स्कोडा कार चालकाने विनोद तेली यांच्या वाहनास जोरदार धडक दिली त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघातात गाडीतील अन्य सहप्रवासी देखील गंभीररीत्या जखमी झाले होते.

विनोद तेली यांची अलीकडे एका आंतरराष्ट्रीय नामांकित कंपनीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी या उच्च पदावर नेमणूक  झाली होती . त्यांचा वार्षिक पगार कित्येक लाखात होता. त्यांच्या कायदेशीर वारसानी ॲड. विलास परब यांच्या मार्फत अपघातातील मृत्यूबाबत नुकसान भरपाई मिळावी म्हणून सिंधुदुर्ग येथील मोटार अपघात क्लेम न्यायाधिकरणाकडे पिटीशन दाखल  केले होते. कायदेशीर वारसांच्यावतीने विनोद यांच्या कंपनीच्या अधिकाऱ्यांना, आयकर विभागाचे मुंबई येथील डेप्युटी अधिकारी, सिंधुदुर्ग विभागाचे आयकर अधिकारी याना  समन्सद्वारे बोलावून त्यांच्या साक्षी नोंदवून विनोद यांच्या उत्पनाबाबत पुरावा सादर केला होता.

न्यायालयाने रू. 9,41,31596/ ईतकी नुकसान भरपाई 9% व्याजासह म्हणजेच रू. 18,30,85943/ मात्र इतकी नुकसानभरपाई रक्कम समोरील वाहनाचे मालक आणि चालक यांनी विनोद तेली यांच्या वारसांना एक महिन्याच्या आत द्यावी असा आदेश पारित केला असून मुदतीत रक्कम न भरल्यास 12 टक्के व्याज भरावे असा  देखील आदेश केला आहे.  विनोद तेली यांच्या वारसांच्यावतीने ॲड. विलास परब, ॲड. तुषार परब आणि ॲड. कुणाल लाड यांनी काम पाहिले आहे.