रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी नेत्रा ठाकूर यांच्या नावाची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. वेळणेश्वर जिल्हा परिषद गटातून त्या मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्यामुळे त्यांच्या नेतृत्वाकडे विशेष लक्ष वेधले जात आहे.
गेली दहा वर्षे जिल्हा परिषदेमध्ये सदस्य म्हणून काम करताना त्यांनी विविध विकासकामांना गती दिली आहे. शिक्षण, आरोग्य, महिला व बालकल्याण, ग्रामीण पाणीपुरवठा आणि रस्ते विकास या क्षेत्रांत त्यांनी सातत्याने पाठपुरावा करत निधी उपलब्ध करून दिल्याची चर्चा आहे.
जिल्हा नियोजन समितीच्या कामकाजातही त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला होता. वेळणेश्वर गटातील मतदारांनी दाखवलेला विश्वास आणि मोठे मताधिक्य हे त्यांच्या कार्यशैलीचे द्योतक मानले जात आहे. संघटन कौशल्य, प्रशासनाशी असलेला समन्वय आणि तळागाळातील जनसंपर्क या जोरावर अध्यक्षपदासाठी त्या सक्षम दावेदार असल्याचे त्यांच्या समर्थकांचे मत आहे.
अध्यक्षपदाच्या निवडीबाबत अंतिम निर्णय पालकमंत्री उदय सामंत घेणार आहेत .सध्या तरी रत्नागिरी जिल्ह्यात नेत्रा ठाकूर यांच्या नावाचीच जोरदार चर्चा रंगत आहे.

