टिपू सुलतानच्या मुद्द्यावरून राजकारण पेटले; संजय राऊतांचा भाजपवर घणाघात

0
5

​काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान यांच्याबद्दल केलेल्या एका विधानामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सपकाळ यांनी टिपू सुलतान यांच्या कार्याची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केल्याने नवीन वाद निर्माण झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे स्वराज्य आणि शौर्याचा इतिहास घडवला, तशाच प्रकारचे कार्य टिपू सुलतान यांनी केले असून त्यांना महाराजांच्या बरोबरीचे स्थान द्यायला हवे, असे मत सपकाळ यांनी व्यक्त केले होते. या विधानानंतर भारतीय जनता पक्ष (भाजप) आक्रमक झाला असून महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये कलगीतुरा रंगला आहे. राज्यभरातून यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत असतानाच आता शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत यांनी या वादात उडी घेत भाजपवर जोरदार पलटवार केला आहे.

​संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना भाजपच्या भूमिकेवर सडकून टीका केली. टिपू सुलतानच्या विषयावरून भाजप सध्या जो आक्रमक पवित्रा घेत आहे, त्यापूर्वी त्यांनी स्वतःच्या पक्षाचा इतिहास आणि जुने रेकॉर्ड तपासावेत, असा खोचक सल्ला राऊत यांनी दिला आहे. भाजपला सध्या दुसरे काही काम उरलेले नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. सर्वसामान्य जनता, कष्टकरी, विद्यार्थी आणि नोकरदार वर्गाच्या प्रश्नांवर भाजपने कधीही रस्त्यावर उतरून आंदोलन केले नाही. मुंबईत मेट्रोचा पूल कोसळून निष्पाप लोकांचा बळी गेला, हे पाप भाजपचेच आहे, परंतु त्यावर ते कधीच बोलले नाहीत. मात्र, जिथे हिंदू-मुस्लिम असा धार्मिक वाद निर्माण करून समाजात तेढ निर्माण करता येईल आणि लोकांना संभ्रमात टाकता येईल, असेच मुद्दे भाजप जाणीवपूर्वक उकरून काढत असल्याचा आरोप राऊत यांनी केला.

​भाजपच्या दुहेरी भूमिकेचा पर्दाफाश करण्यासाठी संजय राऊत यांनी जुन्या घटनांचे दाखले दिले. ते म्हणाले की, मालेगाव महापालिकेत टिपू सुलतानचा फोटो लावण्यावरून वाद झाला आणि लोकांच्या आक्षेपानंतर तो फोटो हटवण्यात आला. हा विषय तिथेच संपायला हवा होता, पण भाजपने यावरून संपूर्ण महाराष्ट्रात रान उठवले. महाराष्ट्र हे छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. इतिहासात ज्या नोंदी आहेत, त्या भाजपलाही बदलता येणार नाहीत.

​पुढे बोलताना राऊत यांनी भाजपला त्यांच्याच नेत्यांच्या जुन्या विधानांची आठवण करून दिली. रामनाथ कोविंद हे राष्ट्रपती असताना कर्नाटकात गेले होते, तेव्हा त्यांनी विधानसभेत टिपू सुलतानचा उल्लेख ‘राष्ट्रपुरुष’ आणि ‘महान योद्धा’ असा करून त्यांच्यावर स्तुतीसुमने उधळली होती. त्यावेळी भाजपने त्यांना का रोखले नाही? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला. एवढेच नाही तर, अनेक महापालिकांमध्ये भाजपची सत्ता असताना टिपू सुलतानच्या नावाने प्रकल्प सुरू करण्यात आले होते. मुंबईच्या माजी महापौर रितू तावडे आणि अमित साटम यांनीही अशा प्रस्तावांचे समर्थन केले होते, असे पुरावे राऊत यांनी दिले. त्यामुळे आता भाजपने या विषयावर आरडाओरडा करून “आ बैल मुझे मार” अशी गत करून घेऊ नये. राज्यात पुढील दोन-तीन वर्षे निवडणूक नाही, त्यामुळे उगीचच तोंडाला फेस आणून महाराष्ट्र राज्याला बदनाम करू नका, असे खडे बोल संजय राऊत यांनी भाजपला सुनावले आहेत.

​