विजयदुर्ग बंदरात रो-रो बोटीला धडक; चार होल पडल्याने मुंबईचा प्रवास रद्द, प्रवासी परतले

0
10

सिंधुदुर्ग : मुंबई–विजयदुर्ग रो-रो जलवाहतूक सेवा १ मार्चपासून सुरू करण्यात आली असून कोकणवासीयांकडून या सेवेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता. मात्र आज या सेवेला तात्पुरता अडथळा निर्माण झाला.

विजयदुर्ग बंदरात उभी असलेल्या एम टू एम रो-रो प्रवासी बोटीला मालवाहतूक करणाऱ्या छोट्या टग बोटीची धडक बसली. या धडकेत रो-रो बोटीला चार ठिकाणी होल पडल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे बोटीच्या दुरुस्तीचे काम तातडीने बंदरात सुरू करण्यात आले.

दरम्यान आज ही एम टू एम रो-रो बोट मुंबईच्या दिशेने रवाना होणार होती. या प्रवासासाठी सुमारे २० प्रवासी आणि ७ वाहनांची बुकिंग देखील झाली होती. मात्र बोटीच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने नियोजित प्रवास रद्द करण्यात आला आणि प्रवाशांना परत जावे लागले.

या घटनेमुळे नव्याने सुरू झालेल्या रो-रो सेवेला तात्पुरता ब्रेक लागला असून दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर सेवा पुन्हा सुरू केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.