बोटीचो भोंगो झालो आणि बाबू जलाम्लो……

0
283

कोकण बोट म्हणजे कोकणी माणसाला स्वप्न दाखवणारी व पुरवणारी जादूची बोट होती. होय! कोकणी माणसाला ती जादूचीच वाटे.

आईच्या गोधडीची ऊब वळकटीत बांधून रोजगाराची स्वप्ने पाहायला जाणाऱ्या मुलाचा ऐटदार चाकरमानी होऊन परतत असे. जणू सुरवंटांचे फुलपाखरु व्हावे तसे ! बंदरावरून बोटीत गडप झालेला पोरगा, पती यानंतर महिन्याच्या मनिआॅर्डरच्या रुपाने भेटत असे. रोजगाराच्या आशेने जाणारे कित्येक जण बोटीत चढल्यावर मुंबईच्या गर्दीत हरवले आहेत. जाणाऱ्या बोटीने भोंगा वाजवला की हा भोंगा शंख ध्वनी सारखा बंदरात घुमे. त्यांचे पडसाद गावांतील प्रत्येक घरातील प्रत्येकाच्या मनात उठत असावेत. आजही हे स्वर तसेच मनात बंद कप्यात रुतून बसलेले आहेत. बोट सुरु झाल्यावर धुराड्यांतून जोरदार काळाकुट्ट धुर ती सोडत असे. बोट निघून गेल्यावर त्या धुराचे ढग बंदरांच्या अवकाशातच घुटमळत राहत. लहानपणी आकाशात असणारे ढग या गावात बोटीनेच सोडले आहेत असे लहान मुलांना वाटत असे. ‘बाळग्या हे ढग खयसून इले, असे विचारल्यावर मुंबैतसून बोटीन् हाडले’ असे निरागस उत्तर येत असे. अशी कोकण बोट वाहतूक म्हणजे केवळ एक प्रवासी वाहतूक नव्हती तर कोकणवासियांच्या जीवनाचा, जगण्याचा तो एक धागा होता.

कालओघात बोट वाहतूक बंद झाली. ती पुन्हा कधीही सुरु न होण्यासाठी. कोकण बोटीने केवळ प्रवाशांची वाहतूकच केली नाही, तर वेगळी खाद्यसंस्कृती रुजविली. गोव्याची काजू फेणी अवघ्या जगाला कोकण बोटीमुळे माहीत झाली. तसेच किरिस्तावाचे गोवन केक कोकणला बोटीमुळेच माहीत झाले.एवढेच नव्हे तर डिशलाच खाचा पाडून वाटयांचा आकार देण्याची पद्धत कोकण बोटीचीच. कोकणात ज्या काळात केवळ चहा व शेंगदाण्याचा लाडू मिळत असे, त्यावेळी दिवसातून दोन वेळा कोकण बोट नावाचा ‘मॉल’ बंदरात उभा राहत असे. फळेही कोकण बोटीशिवाय कुठेच मिळत नसत.मुंबई-गोवा प्रवास करताना कोकण बोटीने खाद्यसंस्कृती तयार केली. यात चौगुले स्टीमशिपच्या कोकणशक्ती व कोकणसेवक या दोन बोटींचा समावेश आहे. या बोटीवर खवय्यांची चंगळ असे. तर गरजूंनाही पोटभरणीचे अन्न मिळत होते.कोकण बोटीवर प्रवासी ब-याच वेळा गोवा दारूची चव चाखण्यासाठी येत व जीवाचा गोवा करीत असत. आज भूमार्गाने गोव्याची दारू सिंधुदुर्गात येते. पूर्वी कोकण बोटीवरून ती आणली जायची. अर्थात गोवा दारू पिणारा उच्चभ्रू वर्ग कोकणात फारसा नव्हता. बोटीमध्ये तीन कॅन्टीन असत.
या कॅन्टीनला बोटीतील क्लासप्रमाणे दर्जा असे. ब-याच वेळा मागणीप्रमाणे पदार्थ बनवून मिळत. बोट म्हणजे सतत भूकंप होणारी जमीनच जणू. यामुळे कोकण बोटीवर अर्थात कुठल्याही बोटीवर असलेले सामान जोडलेले असे. जेवण्याच्या थाळीत वेगळया वाटया व डिश देणे शक्य नव्हते. कारण बोटीच्या हेलकाव्यानुसार त्या टेबलावरच अस्ताव्यस्त झाल्या असत्या. यामुळे प्लेटमध्येच खाचा पाडून एक वाटी व एक डिश बनवल्या जात.सध्या अशा डिश मंगल कार्यालय अथवा वसतिगृहात काही वेळा हॉटेलातही वापरतात. त्याची सुरुवात कोकण बोटीवर झाली आहे. हा भांडयाचा नवीन प्रकार बोटीतून आला. टेबलाच्या कडेला एक पट्टी मारलेली असे. जेणेकरून पाण्याचा ग्लास अथवा डिश हालली तरी टेबलाबाहेर येऊन अंगावर पडू नये.किरिस्तावांचे केक हा प्रकार त्यावेळी कोकणात फेमस होता. हे केक खाणारी माणसे चवीने त्याचे वर्णन करतात. हा केक अर्थात गोव्यातील ख्रिश्चनधर्मीय बनवत असल्याने त्या केकचा किरिस्तावांचे केक असा अपभ्रंश झाला असावा.कोकण बोटीप्रमाणे हे केकही नंतर गायब झाले. आता बाजारात केक मिळतात ते मद्रासी लोकांचे अर्थात आताच्या काळात केकचे अप्रुप राहिलेले नाही. तरीही गोवन केकची चव अद्याप लोकांच्या जिभेवर रेंगाळते आहे.
गरीब कोकणी माणसाला मात्र या कोकण बोटीवरच्या मॉलमध्ये जाऊनही आपल्या गरिबीला साजेल असे वागावे लागे. आईने अथवा बायकोने करून दिलेल्या डब्यातच आपले पोट भरावे लागे. ब-याच वेळा आसपासच्या प्रवाशांनाही डबा वाटप करून आपल्या आदरातिथ्याचा लाभ दिला जात होता.जेव्हा कोकणात बोट येई त्याचवेळी बटाटे व बटर मुंबईतून येत असत. बटाटे व बटर हे पदार्थ कधीच दुकानात मिळाले नाहीत. आज गल्लोगल्ली केरळीयन लोकांच्या बेक-या दिसतात. त्या काळात केवळ कोकण बोट हाच केवळ आधार होता.कोकण बोट वाहतुकीत मालवण येथील राजकोट येथे झालेला रोहिणी बोटीचा अपघात व कुलाब्याजवळ झालेला रामदास बोटीचा अपघात आणि त्याच दरम्यान वाहतुकीत झालेले बदल यामुळे कोकण बोटीची क्रेझ संपत गेली आणि कोसळलेली बोट नव्याने समुद्रात दाखल झाली नाही. या दोन अपघातांनी कोकण बोटीच्या इतिहासाचे संदर्भ बदललेले आहेत.
राजकोट येथे १९७२ ला रोहिणी बोट खडकावर आपटून फुटली. मालवणमध्ये येतानाच तिला भोक पडले होते. प्रवाशांना वाचविण्यासाठी कप्तानाने रोहिणी बोटनजीकच्या खडकावर नेऊन आदळली. यामुळे बोट न बुडता प्रवाशांचा जीव वाचला. मात्र, या बोटीच्या अपघाताचे गूढ कायम आहे.रोहिणी बोटीवरील प्रवाशांच्या नशिबात असलेले भाग्य रामदास बोटीवरील प्रवाशांच्या नशिबात नव्हते. खोल समुद्रात ही बोट बुडाल्याने ७२० लोकांचा बुडून मृत्यू झाला. कुलाब्याच्या समुद्रात रामदास बोट बुडाली. ही घटना कोकणवासीय कधीही विसरू शकणार नाहीत. कारण सध्या गाजत असलेल्या टायटॅनिक बोटीच्या अपघातात १३६० जीव गेले. तर रामदास बोटीत ७०० हून अधिक प्रवाशांना जलसमाधी मिळाली.मुंबई-गोवा वाहतूक करताना हा अपघात झाला नाही. मात्र, रामदास बोट बुडाल्याने कोकण वाहतुकीतली एक बोट कमी झाली याचा गंभीर परिणाम बोट वाहतुकीवर झाला. कारण बोट वाहतूक त्या दिवसापासून उशिरा, अवेळी सुरू झाली.रामदास बोटीचा अपघात ही बोट वाहतुकीच्या इतिहासातील धक्कादायक घटना घडली ती १७ जुलै १९४७ रोजी सकाळी ८ वाजून ५ मिनिटांनी गूल आईसलँडजवळ कुलाब्यापासून १५ कि. मी. आत खोल समुद्रात रामदास बोटीला अपघात झाला.या दिवशी गटारी अमावास्या होती. बोटीचे शेख सुलेमान इब्राहिम हे कप्तान होते. पावसाचे दिवस असल्याने साहजिकच रामदास बोट कोकणवासीयांच्या दिमतीला नव्हती. या दिवशी खराब हवामान असल्याचा अहवालच बोटीला पोहोचला नव्हता. ५०० प्रवासी क्षमता असताना सुमारे ७२० हून अधिक प्रवासी घेऊन गटारी अमावास्येच्याच दिवशी रामदास बोट जणू मृत्यूच्या प्रवासाला निघाली.जुलैमधील हवामान म्हणजे ऐन पावसाचे दिवस. समुद्र खवळला होता. कुलाब्याकडे बोट येताच दक्षिणेकडील लाटांनी मारा सुरू केला. कप्तान व बोटीवरचे कर्मचारी सांगत असूनही प्रवासी लाटा बसतात म्हणून बोटीच्या एकाच भागात जमा झाले. बोट एका बाजूने कलू लागली.
प्रवाशांच्या डोळयांसमोर मृत्यू दिसू लागताच हलकल्लोळ उडाला. आरडाओरड, किंकाळयांनी परिसर दणाणून गेला. बोटीवर धावपळ सुरू झाली. कर्मचारी व कप्तान उघडया डोळयाने हताश होऊन ही धावपळ पाहत होते. आता बोटीला जलसमाधी मिळणार हे निश्चित झाले.
प्रवाशांना वाचवण्यासाठी आता समुद्रातील काशाच्या खडकावर बोट लावण्याशिवाय पर्याय नव्हता. सकाळी ८ वाजून ५ मिनिटांनी समुद्रातील खडकाला आदळल्याने बोटीला अपघात झाला.पुढील बाजूने स्टार बोर्डच्या दिशेने पाणी आत शिरले व पुढील बाजूने बुडू लागली. त्याचवेळी ‘पोर्टसाईड’ बंदराकडील बाजूला असलेले प्रवासी एका बाजूला आल्याने वजन वाढले. परिणामत: पुढील अवघ्या दोनच मिनिटांत बोटीला जलसमाधी मिळाली.काशाच्या खडकाचा काहीही उपयोग झाला नाही. बुडालेल्या प्रवाशांमधील काहींनी पोहत सुरक्षितपणे ‘ससून डॉक’ गाठले. ही बातमी दुपारी ३ वाजेपर्यंत समजली. दोन दिवस ही शोध मोहीम सुरूच होती. नेवल, पोर्ट ट्रस्ट आणि र्मकटाईल संस्थांनी अविरत कार्य सुरू ठेवले होते. यामध्ये ७२० जण मेले तर १५५ प्रवासी वाचले त्यांनी पोहत किनारा गाठला. त्यातील काही जण अद्याप जिवंत आहेत.या बोटीत प्रवास करणारे बरेचसे मुंबईतील गिरगाव, परळ भागातील राहणारे प्रवासी होते. त्यांच्या अधिकाऱ्यांनी तीव्रपणे शोध मोहीम राबवूनसुद्धा कुठलेच अवशेष सापडलेले नाहीत. जणू ही बोट समुद्रात लुप्त झाली. पुढे सुमारे १० वर्षानंतर काही अवशेष मुंबईचा बॅलार्ड पियर क्षेत्रानजीक मुंबई किना-याकडे वाहून आले होते.
कोकण किनारपट्टीवर १९६२ साली चौगुले स्टीमशिपने आपली वाहतूक सुरू केली. रोहिणी, सरिता व कोकणसेवक या तीन बोटी कोकण बोट वाहतुकीच्या निमित्ताने कोकण किना-यावर दाखल झाल्या होत्या. या बोटी अत्याधुनिक असल्याने कोकण बोट वाहतुकीला नवी उभारी निर्माण झाली. यातील सरिता ही बोट नंतर नाव बदलून कोकणशक्ती या नावे येत होती. सरिता बोटीची एक आठवण येथे सांगावी लागेल ती म्हणजे या बोटीने भारत पाकिस्थान युद्धात बजावलेली भूमिका महत्वपूर्ण ठरली. मांडवी नदीतील पुलाजवळ हि बोट उभी राही आणि आकाशातील हालचाली टिपून जोरात भोंगा वाजवत असे. हा भोंगा सायरनच काम करे. त्यामुळे गोववंशीयांना योग्यतो संदेश मिळून काळजी घेतली जात असे. नंतरच्या काळात या बोटीने कोकणवासीयांची बरीच सेवा केली. या बोटीनंतर शासनाच्या मोगल लाइन्स या कंपनीने ताब्यात घेतल्या. या बोटी सरकारच्या ताब्यात जाण्याआधी चौगुले स्टीमशिपला तोटा होऊ लागला होता.वाढणारे डिझेलचे भाव, जुनी झालेली सामग्री, बंदराच्या तुलनेत स्वस्त असलेली रस्ता वाहतूक याचा हळूहळू परिणाम बोट वाहतुकीवर दिसू लागला होता. मात्र, कोकणवासीयांना बोटीची सुविधा सुरू राहावी म्हणून केंद्र सरकारने मोगल लाइन्सकडे (भारत सरकारचा अंगीकृत व्यवसाय) ही वाहतूक सोपविली.कोकण किना-यावरील प्रवासी वाहतूक ‘मोगल लाइन्स’ ही कंपनी करीत होती. या कंपनीला कोकण प्रवासी वाहतुकीमुळे जो तोटा सहन करावा लागत होता, त्या तोटयापैकी २० टक्के रक्कम मोगल लाइन्स कंपनीने सोसावी व उरलेल्या तोटयापैकी २५ टक्के भारत सरकार, ४० टक्के महाराष्ट्र शासन व ३५ टक्के गोवा शासनाने प्रतिपूर्ती करावयाची ठरले होते व ही व्यवस्था मे १९८८ पर्यंत होती. १९८८ साली रडतकढत चाललेल्या कोकण बोट वाहतुकीला अखेरचा दणका बसला. राजीव गांधी पंतप्रधान असताना श्रीलंकेमध्ये शांतीसेना नेण्यासाठी मोगल लाइन्सकडून या बोटी काढून घेण्यात आल्या व कोकण बोट वाहतुकीने शेवटचा श्वास घेतला.प्रचंड तोटा सहन करत चाललेली ही वाहतूक बंद करण्याची संधी केंद्र सरकार शोधतच होते. प्रवासी वाहतूक बंद करण्याआधी एक-दोन दिवस बोर्ड लागले. आज आपण पाहतो आहोत ही शेवटची बोटफेरी असे कित्येकांना वाटलेही नसेल. मात्र ज्या बोटी प्रवासी घेऊन मुंबईला घेऊन गेल्या त्या परत आल्याच नाहीत.
केंद्र शासनाच्या आदेशानुसार शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, यांनी एप्रिल १९९० पासून मुंबई-गोवा अशी थेट वाहतूक सुरू केली ती मे १९९०च्या तिस-या आठवडयापर्यंत चालू होती. त्या कालावधीमध्ये या बोटी महाराष्ट्र राज्यातील कोणतीही बंदरे घेत नव्हत्या. बोटीने महाराष्ट्रातील बंदरे घ्यावीत यासाठी शासन स्तरावर प्रयत्न चालू होते. पण ‘केंद्र शासनाने राज्यातील बंदरे घेण्याबाबत निर्णय घेतला असता, या बोटी १९६४ व १९६५ मध्ये विकत घेतल्या होत्या. त्यांची आयुष्य मर्यादा संपल्यामुळे त्यावर देखभाल व दुरुस्तीसाठी येणारा खर्च परवडण्यासारखा नव्हता’ म्हणून या शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने मोडीत काढून विकलेल्या आहेत.
केंद्र व राज्य शासनाने बोट सेवेचे खाजगीकरण करण्याचा निर्णय घेतला त्यावेळी फक्तमेसर्स सत्यगिरी शिपिंग कंपनीच कोकणची जलसेवा चालू करण्यासाठी पुढे आली होती. त्यांना जून १९९२ पर्यंत वाढवून देण्यात आली होती. तसेच रत्नागिरी शिपिंग कंपनी एक कॅटामरिन (हॉवरक्राफ्ट) आणून ऑक्टोबर १९९४ मध्ये सेवा सुरू करीत आहे. असे कंपनीकडून कळविण्यात आले होते. परंतु या कंपनीने अखेपर्यंत कोकण बोट सेवा सुरू केलेली नाही.या कंपनीकडून पुन्हा नवीन प्रस्ताव ८ मे १९९५ रोजी सादर करण्यात आला यानंतर ६ जुलै १९९५ रोजी ‘ना हरकत’ दाखले देण्यात आला होता. कंपनीने वेळोवेळी केलेल्या विनंतीनुसार कंपनीला सहा-सहा महिन्यांनी मुदतवाढ देण्यात आली होती व शेवटची एक वर्षाची मुदतवाढ ९ जुलै १९९७ च्या पत्रान्वये ५ जुलै १९९८ पर्यंत देण्यात आलेली होती.मात्र जलवाहतूक सेवा शेवटपर्यंत सुरू करण्यात आलेली नाही. त्याचप्रमाणे इतर अन्य कंपनी एस. के. कॉन्फिडन्स शिपिंग कंपनी, कॉइन वॉटरवेज कंपनी यांना या सेवा चालू करण्याकरिता ‘ना हरकत’ दाखले देण्यात आले आहेत. परंतु त्या कंपन्यांकडून अजूनपर्यंत जलवाहतूक सेवा सुरू केली गेली नाही. दरम्यानच्या काळात दमानिया कंपनीने प्रायोगिक तत्त्वावर मुंबई ते गोवा ही कॅटामरिन (हॉवर क्राफ्ट) सेवा सुरू केली होती, परंतु ही सेवा २३ एप्रिल १९९६पासून बंद आहे. त्यानंतर फ्रँक शिपिंग या कंपनीकडून मुंबई ते गोवा अशी कॅटामरिन (हॉवर क्राफ्ट) सेवा सुरू करण्यात आली होती. त्यासाठी त्यांच्याकडून तिकीट रुपये १४०० ते १६०० आकारण्यात येत होते. त्यांचेकडून रत्नागिरी बंदरासाठी सेवा देण्यात येत नव्हती.
१९८८ साली कोकण बोट वाहतूक बंद झाली. त्याचवेळी वाहतुकीची परिस्थिती सुधारत चालली होती. ब-यापैकी रस्ते झाले होते.एस. टी. महामंडळाच्या बसेसनी आपले जाळे विस्तारले होते. खाजगी गाडया बाळगण्याची फॅशन हळूहळू येत होती. मुंबई-गोवा भूमार्गाने जोडले होते. यामुळे परिस्थिती अशी बदलली की जलमार्गाने प्रवासी वाहतूक ही तोटयाची ठरली. जलमार्गाने जाण्यापेक्षा भूमार्गाने जाण्याकडे अनुकूल परिस्थिती निर्माण झाली.सध्या बोट वाहतुकीसाठी वारंवार मागणी होते. मात्र ती चालू करणे आता शक्य नाही. सात तासात मुंबई गाठणारी कोकण रेल्वे आली आहे.आठ तासात कोल्हापूर मार्गे पुणे-बेंगलोर हायवेने मुंबईला वेगाने जाता येते.अद्यापही बोटीने मुंबई गाठायची म्हटली तरी मुंबई-गोवा या प्रवासाला चोवीस तास लागतात. याशिवाय तिकीट परवडणारे नाही. घराच्या काही अंतरावर मुंबईला जाण्यासाठी लक्झरी बसेस येत असतात.
मात्र नवीन पिढीला कोकण बोट वाहतुकीचे दिवस कधीच अनुभवता येणार नाहीत. पावसाळयात बुडालेली रोहिणी बोट, मालवणमध्ये बुडालेली रामदास बोट याचा भयकारी इतिहास कोकण बोट वाहतुकीला आहे. ‘बोटीचो भोंगो झालो आणि बाबू जलाम्लो..’ अशी खूण सांगणारी कित्येक माणसे केवळ उरली आहेत. सकाळी ५ वाजता मुंबईहून बोटीतून उतरलेल्या प्रवाशांना घेऊन येणारे खपाटे, नाष्टाची सोय करणारी हॉटेल्स, त्यांना आणायला जाणा-या एस. टीच्या गाडया होत्या. मात्र ज्या दिवशी बोटी बंद झाल्या त्याच्या दुस-या दिवशी हे काहीच नव्हते. मच्छीमारी बोटीसाठी सुरू असणारे दीपगृह वगळता आता बंदरांची नामोनिशाण मिटत आहेत. आईच्या गोधडीची ऊब वळकटीत बांधून स्वप्ने पाहायला जाणा-या मुलाचा ऐटदार चाकरमानी होऊन कोकण बोटीतून परतत असे. आज याच्या फक्त आठवणी उरल्या आहेत.