वेंगुर्ले (ता. कुडाळ) | शिरोडा वेळागर समुद्रकिनारी फिरण्यासाठी आलेल्या बेळगाव (कर्नाटक) येथील आठ पर्यटकांवर आज काळाचा घाला ओढवला. दुपारी सुमारे ४:३० वाजण्याच्या सुमारास समुद्रात पोहण्यासाठी गेलेल्या या पर्यटकांपैकी सात जण पाण्यात बुडाले. त्यापैकी तिघांचे मृतदेह सापडले असून एक महिला सुदैवाने बचावली आहे. मात्र उर्वरित चार जणांचा शोध अद्याप सुरू आहे.
स्थानिक माहितीनुसार, हे सर्व पर्यटक आपल्या नातेवाईकांसह शिरोडा येथे पर्यटनासाठी आले होते. समुद्रात आंघोळीसाठी उतरलेल्या या पर्यटकांना पाण्याचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडली. घटनास्थळी एकच गोंधळ उडाला आणि तत्काळ शोधमोहीम सुरू करण्यात आली. सापडलेल्या तिघांना बाहेर काढण्यात आले असले तरी त्यांचा मृत्यू झाल्याची पुष्टी करण्यात आली आहे. सायंकाळी उशीर झाल्याने शोधकार्यात अडथळे निर्माण होत आहेत.
दुर्घटनेतील मृतांची नावे –
फरीन इरफान कितूर (वय 36, रा. लोंढा, कर्नाटक),नामेरा आफताब अतार (वय 16, रा. अळणावर, जिल्हा आखाड), इबाद इरफान कितूर (वय 12, रा. लोंढा, कर्नाटक)
मृतांमध्ये दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे, तर एक महिलेला बचावण्यात यश आले आहे. चारजण अद्याप बेपत्ता असून त्यांचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे.
शिरोडा किनाऱ्यावरच्या या दुर्दैवी दुर्घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. स्थानिक प्रशासन, पोलीस व बचाव पथके बेपत्ता पर्यटकांच्या शोधासाठी प्रयत्नशील आहेत.

