मुंबई – महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अतिशय वेगवान हालचाली पाहायला मिळत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर त्यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणि राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा सुरू आहे.
विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड, संध्याकाळी शपथविधी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची आज दुपारी बैठक होणार असून, या बैठकीत सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड केली जाणार आहे. त्यानंतर संध्याकाळी लोकभवन येथे त्यांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी पार पडणार असल्याची माहिती आहे. या निर्णयानंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.
शरद पवार यांची प्रतिक्रिया
या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणाले,
“सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबाबत मला अधिकृत माहिती नाही. त्या शपथ घेणार असल्याचं वाचनात आलं आहे. त्यांच्या पक्षाने हा निर्णय घेतलेला दिसतो. हा पूर्णपणे पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे.”
सरकारला धोका नाही – काँग्रेस
दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारच्या स्थैर्यावर भाष्य करताना सांगितले की,
“या सरकारकडे स्पष्ट बहुमत आहे. बहुमताच्या पलीकडे हे सरकार आहे. त्यामुळे सरकारला कोणताही धोका नाही. अशा परिस्थितीत एवढ्या घाईने निर्णय का घेतले जात आहेत, यावर मी काही बोलू शकत नाही.”
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना वेग
दुसरीकडे, राज्यातील महानगरपालिकांमध्ये महापौर आणि उपमहापौर निवडींची प्रक्रिया वेगाने सुरू झाली असून, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचारालाही लवकरच सुरुवात होण्याची शक्यता आहे. या सर्व घडामोडींमुळे राज्यातील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे.

