“अजित पवार मुख्यमंत्री का झाले नाहीत? संजय राऊत यांचे मोठे विधान”

0
14

मुंबई – राज्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा उधाण आले असताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठे आणि परखड विधान केले आहे. शरद पवारांनी मनात आणले असते तर अजित पवार मुख्यमंत्री झाले असते, असे सांगत मुख्यमंत्रीपद हे केवळ क्षमतेवर नव्हे तर नशिबावरही अवलंबून असते, असे राऊत म्हणाले.

भाजपाच्या काळात अनेक राज्यांमध्ये सक्षम नेत्यांना डावलून होयबा लोकांना मुख्यमंत्री करण्यात आले, मात्र अजित पवार कधीच होयबा नव्हते, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले. तसेच अजित पवारांनी दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र आणण्यासाठी पुढाकार घेतला होता आणि त्यासाठी बैठका झाल्याची माहिती दोन्ही बाजूच्या नेत्यांनी दिल्याचा दावा राऊत यांनी केला.

एका विशिष्ट दबावामुळे अजित पवारांना पक्ष बदलावा लागला. धाक, दहशत आणि धमक्यांमुळेच हा निर्णय घ्यावा लागल्याचेही त्यांनी सूचित केले. दिल्लीत बसलेल्या “व्यापारी नेत्यांना” मराठी नेतृत्व एकत्र आलेले नको असून “तोडा-फोडा आणि राज्य करा” हीच त्यांची नीती असल्याचा आरोपही संजय राऊत यांनी केला.

राष्ट्रवादी काँग्रेस हा महाराष्ट्राचा पक्ष असून त्याचा अध्यक्ष पाटील, जाधव किंवा कांबळे कुणीही असावा, हीच लोकभावना असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.