मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात ‘राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे विलीनीकरण’ हा विषय कळीचा ठरला आहे. या प्रकरणावरून आता सत्ताधारी भाजप आणि शरद पवार गट यांच्यात कलगीतुरा रंगला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शरद पवारांच्या भूमिकेवर तीव्र आक्षेप घेतले आहेत.
भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सोशल मीडियाद्वारे शरद पवारांवर टीकेची झोड उठवली आहे. त्यांनी पवारांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत गंभीर प्रश्न विचारले आहेत:
घाई कशासाठी ?: अपघाताच्याच दिवशी विलीनीकरणाची चर्चा सुरू करण्याची घाई का झाली? राष्ट्रवादीकडून अशी कोणतीही अधिकृत मागणी नसताना हा विषय कोणी पुढे आणला?
राजकीय हतबलता: विलीनीकरणाचा आग्रह ही पवार गटाची राजकीय हतबलता आहे का?
भूमिकेचे काय?: ज्या ‘धर्मनिरपेक्ष’ भूमिकेचा शरद पवार नेहमी उल्लेख करतात, ती भूमिका विलीनीकरणाच्या चर्चेवेळी बाजूला सारली गेली का?
मविआचे भवितव्य: जर दोन्ही गट एकत्र येणार होते, तर महाविकास आघाडी आणि युपीएचे भवितव्य काय असते, हा प्रश्न मित्रपक्षांना का पडला नाही?
नैतिक उंचीचा अभाव: “सध्या राजकारण नको, मी सुनेत्रा पवारांच्या पाठीशी खंबीर आहे,” अशी परिपक्व भूमिका शरद पवारांनी का घेतली नाही?
‘इकोसिस्टीम’वर टीका
केशव उपाध्ये यांनी पवारांच्या समर्थनार्थ बोलणाऱ्या यंत्रणेवर (Eco-system) टीका करताना म्हटले की, शरद पवार जे बोलतात ते सत्य म्हणून पाजळले जाते, पण यावेळी पवारांनी संयम पाळण्याऐवजी राजकारणाला प्राधान्य दिले. सुनेत्रा पवार आणि भाजपला लक्ष्य करून जबाबदारीपासून पळ काढण्याचा हा प्रकार असल्याची टीका भाजपने केली आहे.
अजित पवारांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या राजकीय पोकळीत आता ‘विलीनीकरण’ विरुद्ध ‘भाजपचे सवाल’ असा नवा संघर्ष पाहायला मिळत आहे.
शरद पवारांची विश्वासार्हता आणि पवार गटाची अगतिकता शरद पवार बोलतात आणि त्यांच्या एचएमव्ही — His Master’s Voice — इकोसिस्टीमकडून तेच शब्द कोणताही विचार न करता, प्रश्न न विचारता, अक्षरशः सत्य म्हणून पाजळले जातात. हा आता अपवाद राहिलेला नाही; तो पायंडाच बनला आहे. अजित पवार यांच्या दुर्दैवी अपघाती निधनानंतर पवार गटाकडून जे राजकारण सुरू झाले, ते पाहता खरे तर शरद पवार यांच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित व्हायला हवे होते. मात्र तसे न होता, सोयीस्करपणे सुनेत्रा पवार आणि भाजपावर टीकेचे बाण सोडले गेले. हा राजकीय प्रामाणिकपणा नव्हे, तर जबाबदारीपासून पळ काढण्याचा प्रकार आहे. या निमित्ताने काही साधे, पण अस्वस्थ करणारे प्रश्न उपस्थित होतात. ज्या दिवशी अपघात घडला, त्याच दिवशी पवार गटाकडून विलिनीकरणाची चर्चा सुरू झाली आणि त्या चर्चेला खुद्द शरद पवार यांनी सहमती दर्शवली. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसकडून अधिकृतपणे कोणीही अशा चर्चेची मागणी केलेली नव्हती. मग हा विषय इतक्या घाईने पुढे आणण्याची गरज नेमकी काय होती? विलिनीकरणाची चर्चा ही पवार गटाची राजकीय हतबलता होती का? कारण अजित पवार हे रालोआ आणि महायुतीतच राहणार, हे त्या क्षणी स्पष्ट होते. जर विलिनीकरण होणारच होते, तर मग शरद पवारांची तथाकथित धर्मनिरपेक्ष भूमिका कुठे गेली? ज्या भूमिकेचे कौतुक करताना माध्यमे कधीच थकत नव्हती, ती भूमिका अचानक गुंडाळून ठेवण्यात आली का? विलिनीकरणाचा विचार सुरू होता, तर मग केंद्रातील युपीए आणि राज्यातील मविआ यांचे पुढे काय, हा प्रश्न एकाही माध्यमकर्मीला पडला नाही, संजय राऊत यांनाही हा प्रश्न पडू नये? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न… दस्तुरखुद्द शरद पवार यांनी अशी स्पष्ट भूमिका का घेतली नाही की— “सध्या विलिनीकरणाची कोणतीही चर्चा नको. मी कुटुंबातील ज्येष्ठ म्हणून सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. त्या जे निर्णय घेतील ते मला मान्य आहेत. दुखवटा संपल्यानंतरच राजकीय चर्चा करू.” संयम, परिपक्वता आणि नैतिक उंची दर्शवणारी ही भूमिका शरद पवार घेऊ शकले नाहीत—यामागे नेमकं कारण काय?