पुणे-बंगळुरू महामार्गावर कांद्याचा ‘वांदा’; ट्रक उलटल्याने ५ किमीची वाहतूक कोंडी

0
6

घुणकी: पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील घुणकी येथील ओढ्याच्या पुलावर पहाटेच्या सुमारास कांद्याची वाहतूक करणारा ट्रक उलटल्याने मोठी दुर्घटना घडली. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना ५ किलोमीटरपेक्षा जास्त अंतरापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

कोल्हापूरच्या दिशेने कांदा घेऊन जाणारा हा ट्रक पुलावर आला असता चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या मध्यभागीच उलटला. ट्रक उलटल्यामुळे कांद्याची पोती महामार्गावर विखुरली गेली, परिणामी वाहतूक पूर्णतः थांबली. मुंबई आणि पुण्याहून पहाटेच्या वेळी कोल्हापूरच्या दिशेने येणारे प्रवासी या कोंडीत तासनतास अडकून पडले होते.

घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस मदत कक्ष आणि हायवे हेल्पलाईनच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त ट्रक बाजूला करण्यात आला आणि महामार्गावर विखुरलेला माल हटवून वाहतूक पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न करण्यात आले.

सध्या या परिसरात पुलाचे बांधकाम सुरू असल्याने वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आली आहे. मात्र, रस्ता अरुंद असल्याने येथे वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. या अपघातामुळे प्रवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागले, तसेच ट्रकचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.