गडचिरोलीत सी-६० जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये भीषण चकमक; एक नक्षलवादी ठार, दोन तळ उद्ध्वस्त

0
4

गडचिरोली: महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील भामरागड तालुक्यात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या जोरदार चकमकीत एका नक्षलवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. या कारवाईत नक्षलवाद्यांचे दोन तळ उद्ध्वस्त करण्यात आले असून, दुर्दैवाने चकमकीत सी-६० पथकातील एक जवान जखमी झाला आहे.

नक्षलवाद्यांच्या कंपनी क्रमांक १० चे सदस्य आणि छत्तीसगडमधील काही नक्षलवादी भामरागडमधील फोदेवाडा गावाजवळील घनदाट जंगलात एकत्र आल्याची गोपनीय माहिती गडचिरोली पोलीस दलाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे ४ फेब्रुवारीपासून भामरागडचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली सी-६० पथकाच्या १४ तुकड्यांनी नक्षलविरोधी शोधमोहीम हाती घेतली होती.

बुधवारी (४ फेब्रुवारी) झालेल्या पहिल्या चकमकीत पोलिसांनी नक्षल्यांचे दोन मोठे तळ उद्ध्वस्त केले होते. मात्र, घनदाट जंगल आणि भौगोलिक परिस्थितीचा फायदा घेत नक्षलवादी पसार झाले. ५ फेब्रुवारी रोजी सकाळी अतिरिक्त ४ सी-६० पथके आणि सीआरपीएफच्या क्यूएटी तुकडीला पाचारण करून ही मोहीम अधिक तीव्र करण्यात आली.

गुरुवारी दुपारी पुन्हा एकदा पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली. या कारवाईनंतर शोधमोहीम राबवली असता एका पुरुष नक्षलवाद्याचा मृतदेह सापडला. घटनास्थळावरून जवानांनी एक एके-४७ रायफल, एक एसएलआर आणि मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य जप्त केले आहे. ठार झालेल्या नक्षलवाद्याची ओळख पटवण्याचे काम अद्याप सुरू आहे.

संध्याकाळच्या सुमारास झालेल्या दुसऱ्या चकमकीत नक्षलवाद्यांच्या गोळीबारात सी-६० पथकाचा एक जवान जखमी झाला. त्याला तातडीने जंगलातून बाहेर काढून पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे समजते.

सदर भागात अद्यापही शोधमोहीम सुरू असून चकमकीत आणखी काही नक्षलवादी ठार किंवा जखमी झाल्याची शक्यता पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी वर्तविली आहे. मोहीम पूर्ण झाल्यानंतरच याबद्दलचा सविस्तर तपशील समोर येईल.