३२ तासांच्या वाहतुक कोंडीनंतर राज्यशासन झाले जागे, ‘एमएसआरडीसी’चे कान उपटले

0
6

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर नुकत्याच झालेल्या भीषण वाहतूक कोंडीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे. या घटनेमुळे हजारो वाहनचालकांना तब्बल अनेक तास महामार्गावर अडकून पडावे लागले होते. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधित विभागाला चौकशी करून सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.दरम्यान टोल न घेण्याचे आदेश दिले आहे.

या वाहतूक कोंडीमुळे निर्माण झालेली परिस्थिती, प्रशासनाकडून करण्यात आलेली उपाययोजना, तसेच भविष्यात अशा प्रकारची घटना पुन्हा घडू नये यासाठी कोणती तयारी आवश्यक आहे, याचा सखोल अभ्यास करून शिफारशींसह अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला (MSRDC) दिले आहेत. आपत्कालीन परिस्थितीत वाहतूक व्यवस्थापनात कोणत्या त्रुटी राहिल्या, याचाही तपशीलवार आढावा घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या वाहतूक कोंडीची दखल घेतली असून, कोंडीत अडकलेल्या वाहनांकडून टोल वसूल करू नये, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. नागरिकांना झालेल्या गैरसोयीची शासनाने जबाबदारी स्वीकारली पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

यासोबतच भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी मुंबई–पुणे एक्स्प्रेस वेवर विशेष आपत्कालीन वाहतूक आराखडा तयार करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. अपघात, गळती, नैसर्गिक आपत्ती किंवा इतर तांत्रिक अडचणींच्या वेळी तातडीने वाहतूक सुरळीत करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यावर भर देण्यात येणार आहे.