रामदास कदमांचे वक्तव्य गलिच्छ; सुनील तटकरेंनी सुनावले खडे बोल

0
6

मुंबई-शिवसेना नेते रामदास कदम यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर केलेल्या विधानावरून राज्याच्या राजकारणात नवा कलगीतुरा रंगला आहे. कदम यांनी सुनील तटकरे यांच्यावर केलेल्या गंभीर आणि वैयक्तिक टीकेला तटकरे यांनी मर्मभेदी शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. “रामदास कदम यांच्या गलिच्छ वक्तव्यावर मी काहीही बोलू इच्छित नाही, कारण चिखलात दगड मारला तर त्याचा शिंतोडा आपल्याच अंगावर उडतो,” अशा शब्दांत तटकरे यांनी कदमांच्या टीकेला केराची टोपली दाखवली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आम्ही अजितदादांच्या नेतृत्वाखाली अत्यंत मेहनतीने उभा केला असून, विधानसभा निवडणुकीत ४१ जागा जिंकून आम्ही आमचे अस्तित्व सिद्ध केले आहे. त्यामुळे पक्षाचे निर्णय घेण्याचा सर्वस्व अधिकार आमचा आहे, असेही तटकरे यांनी सांगितले.

रामदास कदम यांनी सुनील तटकरे यांच्यावर ‘चाणाक्ष राजकारण’ केल्याचा आरोप केला होता. अजित पवारांचे अंत्यसंस्कार पूर्ण होण्यापूर्वीच राजकीय स्वार्थासाठी सुनेत्रा पवार यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले, अशी बोचरी टीका कदम यांनी केली होती. या टीकेचा समाचार घेताना तटकरे यांनी कदमांना त्यांच्या भूतकाळाची आठवण करून दिली. “त्यांनी स्वतः मातोश्री का सोडली आणि इतरांची साथ का धरली, हे आम्ही त्यांना कधी विचारायला गेलो नाही,” असे म्हणत तटकरे यांनी कदमांच्या राजकीय भूमिकेवरच सवाल उपस्थित केला.

आपल्या ४५ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीचा दाखला देत तटकरे यांनी बॅरिस्टर ए.आर. अंतुले यांचा आशीर्वाद आणि त्यांनी दिलेली शिकवण हीच आपली शिदोरी असल्याचे नमूद केले. “कोण काय बोलतं याकडे मी लक्ष देत नाही, कारण मला जनतेचे पूर्ण पाठबळ आहे,” असे म्हणत त्यांनी कदमांच्या आरोपांमधील हवा काढून घेतली. दोन ज्येष्ठ नेत्यांमधील या वाकयुद्धामुळे महायुतीमधील अंतर्गत कलह पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.