मुंबई-महाराष्ट्र राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गत येणाऱ्या १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शनिवारी उत्स्फूर्तपणे मतदान पार पडले. ५० टक्के आरक्षणाच्या मर्यादेत असलेल्या सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर आणि लातूरसह १२ जिल्ह्यांमध्ये सरासरी ७० ते ७५ टक्के इतके मतदान झाले आहे.
मतदान प्रक्रिया सुरू असताना काही ठिकाणी मतदान यंत्रे बंद पडणे आणि किरकोळ वादावादीच्या घटना घडल्या, मात्र एकूणच निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली. या निवडणुकीच्या निमित्ताने रिंगणात उतरलेल्या एकूण ७,४३८ उमेदवारांचे राजकीय भवितव्य आता मतदान यंत्रांमध्ये बंद झाले असून, राज्याचे लक्ष सोमवारच्या निकालाकडे लागले आहे.
दरम्यान, सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये मतदान केंद्रांवर लहान मुलांना मतदान यंत्रापर्यंत जाऊ दिल्याचे गंभीर प्रकार समोर आले आहेत. या घटनेची राज्य निवडणूक आयोगाने तात्काळ दखल घेतली असून, कर्तव्यात कसुरी करणाऱ्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यातील या महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये झालेल्या या मतदानानंतर आता राजकीय गणिते मांडली जात आहेत. सोमवारी होणाऱ्या मतमोजणीनंतर ग्रामीण भागातील सत्तेची खरी चावी कोणाकडे जाणार, याचे चित्र स्पष्ट होईल.

