मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान प्रवासादरम्यान झालेल्या तांत्रिक बिघाडानंतर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते प्रमोद हिंदुराव यांनी एक खळबळजनक दावा केला असून, अजित पवारांच्या त्या दिवसाच्या प्रवासाचे नियोजन कसे बदलले, याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.
प्रमोद हिंदुराव यांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार त्या दिवशी विमानाने प्रवास करणारच नव्हते. सुरुवातीला त्यांनी रस्तेमार्गे (बाय रोड) जाण्याचे ठरवले होते. मात्र, आदल्या दिवशी त्यांना ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल यांचा फोन आला. मंत्रालयातील काही महत्त्वाच्या फाईल्सवर सह्या करण्यासंदर्भात ही चर्चा झाली होती. प्रफुल पटेल यांच्या कामामुळे आणि फाईल्सवरील सह्यांच्या प्रक्रियेला अपेक्षित वेळेपेक्षा जास्त उशीर झाला. या विलंबामुळे अजित पवारांना त्यांचे रस्तेमार्गे जाण्याचे नियोजन रद्द करावे लागले आणि वेळेची बचत करण्यासाठी त्यांनी अखेरच्या क्षणी विमानाने प्रवास करण्याचा निर्णय घेतला.
आमदार रोहित पवार यांनीदेखील यापूर्वीच अजित पवारांच्या विमान प्रवासाबाबत आणि विमान कंपनीच्या कारभारावर संशय व्यक्त केला होता. एका नेत्याच्या भेटीमुळे उशीर झाल्याने अजितदादांना विमानाने जावे लागले, असे रोहित पवारांनी म्हटले होते. आता प्रमोद हिंदुराव यांनी थेट प्रफुल पटेल यांच्या फोनचा उल्लेख केल्याने रोहित पवारांच्या दाव्याला एका प्रकारे पुष्टी मिळाली आहे. या नव्या खुलाशामुळे अजित पवारांच्या त्या प्रवासाबाबतची गुढता वाढली असून, राजकीय वर्तुळात यावर आता नवी चर्चा सुरू झाली आहे.

