दोडामार्ग आंबेली येथे रस्त्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात दुचाकी कोसळून पती-पत्नी जखमी

0
5

दोडामार्ग – तालुक्यातील आंबेली येथे आज सकाळी झालेल्या एका अपघातात दुचाकीवरील पती-पत्नी जखमी झाले. रस्त्याच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात दुचाकी कोसळल्याने हा अपघात घडला.

चंदगड तालुक्यातील पार्ले येथील रहिवासी मोतीराम मयेकर आणि सरिता मयेकर हे पती-पत्नी आज सकाळी दुचाकीवरून कामानिमित्त गोवा येथे जात होते. आंबेली परिसरात समोरून येणाऱ्या एका वाहनाला बाजू देताना दुचाकीचा अंदाज चुकला आणि वाहन रस्त्याशेजारील खोदलेल्या खड्ड्यात गेले.

रस्त्याच्या कामासाठी या ठिकाणी मोठे खड्डे खोदण्यात आले आहेत. तिथे कोणतेही दिशादर्शक फलक किंवा संरक्षक कठडे नसल्याने ही दुर्घटना घडल्याचे समोर येत आहे. अपघात झाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने धाव घेत जखमींना बाहेर काढले. घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिका बोलावून मयेकर दांपत्याला दोडामार्ग येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.