अब्दुल सत्तारांच्या मंदिर प्रवेशावरून वाद पेटला; हिंदू धर्म स्विकारा, शुद्धीकरणानंतर भाजप नेत्याचा सल्ला

0
3

छत्रपती संभाजीनगरमध्ये महाशिवरात्रीच्या पवित्र पर्वावर शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी शंकराच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतल्याने एक नवीन धार्मिक आणि राजकीय वाद उभा राहिला आहे. अब्दुल सत्तार यांनी मंदिरात प्रवेश करून पूजा केल्यानंतर, ते तिथून निघून जाताच काही स्थानिक तरुणांनी मंदिरात गोमूत्र शिंपडून मंदिराचे शुद्धीकरण केल्याचा प्रकार समोर आला आहे.

​या घटनेनंतर भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी अब्दुल सत्तार यांच्या कृतीवर तीव्र आक्षेप घेतला आहे. भोसले यांनी आपल्या वक्तव्यात म्हटले आहे की, अब्दुल सत्तार हे हिंदू नाहीत, त्यामुळे त्यांनी मंदिराच्या गाभाऱ्यात न जाता बाहेरूनच कळसाचे दर्शन घ्यायला हवे होते. जर सत्तार यांना हिंदू धर्माबद्दल आणि देवांबद्दल इतकीच आस्था वाटत असेल, तर त्यांनी अधिकृतपणे हिंदू धर्म स्वीकारावा, असा सल्लाही तुषार भोसले यांनी दिला आहे. अब्दुल सत्तारांच्या मंदिर प्रवेशावरून आणि त्यानंतर झालेल्या शुद्धीकरणाच्या प्रकारामुळे जिल्ह्यात सध्या उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.