’बिग बॉस मराठी’चे सहावे पर्व सध्या अतिशय रोमांचक वळणावर येऊन पोहोचले आहे. ‘ट्विस्ट’ ही या सीझनची टॅगलाईन असल्याने शोमध्ये एकापाठोपाठ एक आश्चर्यकारक घडामोडी घडताना दिसत आहेत. या पर्वातील सर्वात मोठा धक्का म्हणजे चौथ्या आठवड्यात ‘ड्रामा क्वीन’ राखी सावंतची वाइल्ड कार्ड म्हणून झालेली एन्ट्री. मात्र, आता समोर आलेल्या एका नवीन प्रोमोमुळे राखीचा घरातील मुक्काम संकटात सापडल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
राखी सावंत आणि बिग बॉस हे समीकरण प्रेक्षकांसाठी नवीन नाही. हिंदी बिग बॉस गाजवल्यानंतर, बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वातही तिने धुमाकूळ घातला होता. आता सहाव्या पर्वात प्रवेश करताच तिने पुन्हा एकदा घराचे वातावरण बदलून टाकले आहे. ती आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांचे मनोरंजन करत असली, तरी घरात तिने घातलेला गोंधळ आणि तोडफोड हा चर्चेचा विषय ठरला आहे. घरातील इतर सदस्यांना त्रस्त करण्यासोबतच, तिने बिग बॉसच्या मालमत्तेचे नुकसान केल्याचेही दिसून येत आहे.
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये बिग बॉस राखीच्या वागणुकीवर प्रचंड संतापलेले दिसत आहेत. तिने घरात केलेली तोडफोड आणि नियमभंग यामुळे तिला थेट ‘कन्फेशन रूम’मध्ये बोलावण्यात आले आहे. बिग बॉस तिला स्पष्ट शब्दांत सुनावतात की, “आम्ही तुमच्या विरोधात कठोर कारवाई करणार आहोत.” यानंतर प्रोमोमध्ये काही अनोळखी व्यक्ती घरात येऊन राखीला अक्षरशः ओढत बाहेर घेऊन जाताना दिसत आहेत.
या धक्कादायक प्रकारामुळे प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. अवघ्या आठवडाभरापूर्वी घरात आलेली राखी सावंत खरोखरच शोमधून बाहेर पडणार, की हा बिग बॉसचा एखादा नवीन ‘ट्विस्ट’ आहे, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. कालच करण सोनावणे आणि आयुष संजीव या दोन स्पर्धकांचा प्रवास संपल्याने घरात आधीच तणावाचे वातावरण आहे. आता राखीच्या या प्रकरणाचा उलगडा आजच्या एपिसोडमध्येच होणार आहे. प्रेक्षकांना हा ड्रामा कलर्स मराठी वाहिनीवर रात्री ८ वाजता पाहता येईल.

