पुणे जिल्ह्यातील शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बारामती शहरात एका धक्कादायक प्रकारामुळे शैक्षणिक वर्तुळ हादरून गेले आहे. येथील एका नामांकित महाविद्यालयातील प्राध्यापकाने चक्क विद्यार्थिनींकडे शरीरसुखाची मागणी करत त्यांचा विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी संबंधित प्राध्यापकावर बारामती शहर पोलीस ठाण्यात ‘पोक्सो’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, नितीन तावरे असे या आरोपी प्राध्यापकाचे नाव आहे. तो बारामतीतील एका महाविद्यालयात इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनींना शिकवतो. त्याने २२ जानेवारी ते १२ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत महाविद्यालयातील विद्यार्थिनींशी अश्लील वर्तन केल्याचा आरोप आहे. सदर प्राध्यापकाने विद्यार्थिनींना व्हॅलेंटाईन वीक दरम्यान गुलाब, टेडी बेअर आणि चॉकलेट्स देऊन त्यांच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. तसेच, त्याने विद्यार्थिनींकडे पाहून अनेकदा सूचक आणि अश्लील वक्तव्ये केली.
इतकेच नव्हे तर, वर्गात शिकवत असताना या प्राध्यापकाने विद्यार्थिनींना अयोग्य स्पर्श करणे आणि त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करणे असे प्रकार केले. जेव्हा विद्यार्थिनींनी या गोष्टींना विरोध दर्शवला, तेव्हा त्याने त्यांना वर्गात सर्वांसमोर अपमानास्पद वागणूक दिली. तसेच, “जर माझ्या मागण्यांना प्रतिसाद दिला नाही, तर अंतर्गत मूल्यमापनाचे (Internal Assessment) ३० गुण देणार नाही,” अशी धमकी देऊन त्याने विद्यार्थिनींवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या गंभीर प्रकारामुळे त्रस्त झालेल्या पीडित विद्यार्थिनी आणि त्यांच्या पालकांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत सुनेत्रा पवार यांनी संबंधित शिक्षण संस्थेला तात्काळ पोलीस तक्रार दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानंतर पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून बारामती पोलिसांनी आरोपी नितीन तावरे याच्या विरोधात पोक्सो आणि इतर संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक देविदास साळवे करत आहेत. या घटनेमुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

