देवखेळचा वाद मुख्यमंत्र्यांकडे, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलारांचे मुख्यमंत्र्याना पत्र

0
5

मुंबई- प्राजक्ता माळी आणि अंकुश चौधरी यांची मुख्य भूमिका असलेली ‘देवखेळ’ ही वेब सीरिज सध्या मोठ्या वादात सापडली आहे. झी ५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या या सीरिजमध्ये कोकणातील अत्यंत मानाच्या समजल्या जाणाऱ्या ‘नमन-खेळे’ या लोककलेचे आणि त्यातील दैवत स्वरूप ‘शंकासूर’ या पात्राचे चुकीच्या पद्धतीने चित्रण केल्याचा आरोप होत आहे. या सीरिजमध्ये शंकासूर हा लोकांचे खून करताना दाखवण्यात आल्याने कोकणवासियांच्या धार्मिक आणि सांस्कृतिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या सीरिजवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.

आमदार भास्कर जाधव देखील आक्रमक

आमदार भास्कर जाधव यांनी यापूर्वीच या विषयावर आक्रमक पवित्रा घेत आशिष शेलार यांना निवेदन दिले होते. त्यानंतर शेलार यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, रत्नागिरी जिल्ह्यातील ‘नमन-खेळे’ ही केवळ एक लोककला नसून तिला सामाजिक आणि धार्मिक महत्त्व आहे. ग्रामदैवतांशी थेट संबंध असल्याने या कलेला एक विशेष पवित्र्य लाभले आहे. महाराष्ट्र शासन ही कला जतन करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असून, ९ ते ११ फेब्रुवारी दरम्यान रत्नागिरीतील खेड येथे शासकीय नमन महोत्सवाचेही आयोजन करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत या कलेचा अवमान करणारे चित्रण होणे दुर्दैवी आहे.

कोकणात सामाजिक वातावरण दूषित होऊ नये !

कोकणात शिमगोत्सवाचे वातावरण असताना या वेब सीरिजमुळे जनमानसात तीव्र संताप व्यक्त होत आहे. विविध कलाकार संघटनांनीही याला कडाडून विरोध दर्शवला असून सरकारकडे बंदीची मागणी केली आहे. उत्सवाच्या काळात अशा प्रकारे सामाजिक वातावरण दूषित होऊ नये, यासाठी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन योग्य ती पावले उचलण्याची विनंती आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे. आता राज्य सरकार यावर काय निर्णय घेणार, याकडे संपूर्ण कोकणाचे लक्ष लागले आहे.