कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर रंगलेल्या हाय-व्होल्टेज सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा एकतर्फी धुव्वा उडवला. पहिल्यांदा फलंदाजी करताना ईशान किशनच्या धमाकेदार खेळीच्या जोरावर भारतीय संघाने निर्धारित २० षटकात १७५ धावा करत पाकिस्तानच्या संघासमोर १७६ धावांचे टार्गेट सेट केले होते. या धावसंख्येचा बचाव करताना भारतीय संघातील गोलंदाजांनी पहिल्या षटकापासून पाकिस्तानला धक्क्यावर धक्के दिले.
पहिल्या दोन षटकात हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराहनं मिळून पाकिस्तानच्या आघाडीच्या तिघांना स्वस्तात माघारी धाडले. त्यानंतर भारताच्या फिरकीतील जादू दिसली अन् पाकिस्तान पुन्हा एकदा तोंडावर आपटले. या सामन्यातील विजयासह टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील विजयाची हॅटट्रिक नोंदवत भारतीय संघाने सुपर ८ मधील आपले स्थान पक्के केले. एवढेच नव्हे तर टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धचा आपला रेकॉर्ड ८-१ असा भक्कम केला. भारतीय संघाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या आघाडीच्या गोलंदाजांनी सपशेल गुडघे टेकले. विकेट किपर बॅटर उस्मान खान याने ३४ चेंडूत ६ चौकार आणि एक षटकार मारत पाकिस्तानची आशा पल्लवित केली होती. पण टीम इंडियाचा बापू अक्षर पटेल याने यष्टीरक्षक ईशान किशनकरवी त्याचा करेक्ट कार्यक्रम केला. कुलदीप यादवसह वरुण चक्रवर्तीनंही आपल्या गोलंदाजीचा रकाना भरला. ज्या हार्दिक पांड्याने पाकिस्तानला पहिला दणका दिला त्यानेच उस्मान तारिकला आउट करत भारतीय संघाच्या विजयावर शिक्कामोर्बत केला. १८ व्या षटकात पाकिस्तानचा संघ ११४ धावांवर आटोपला.

