धक्कादायक : जातीवाचक छळाला कंटाळून वडाळ्यात इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

0
17

​मुंबई-राज्याची राजधानी मुंबईतील वडाळा परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. येथे राहणाऱ्या एका १७ वर्षीय अभियांत्रिकी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने राहत्या घरी आपली जीवनयात्रा संपवली आहे. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, मृत विद्यार्थी आणि एका अल्पवयीन मुलीमध्ये मैत्री होती. मात्र, या विद्यार्थ्याचा गेल्या काही दिवसांपासून मानसिक छळ सुरू असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. संबंधित अल्पवयीन मुलीकडून मुलाला त्याच्या जातीवरून सतत हिणवले जात होते. जातीवाचक टोमणे आणि सततच्या अपमानाला कंटाळून या १७ वर्षीय मुलाने अखेर नैराश्येतून हे टोकाचे पाऊल उचलले, अशी माहिती समोर आली आहे.

​या प्रकरणी वडाळा पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेतली आहे. मुलाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी संबंधित कायदल्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणात मृत मुलाच्या अल्पवयीन प्रेयसीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. प्रेमसंबंध, त्यातून होणारा जातीवाचक छळ आणि एका तरुण विद्यार्थ्याचा अंत, यामुळे परिसरात संतापाचे वातावरण आहे.

​