मुंबई-राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गट आमदार रोहित पवार यांनी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) कारवाईबाबत आणि शिखर बँक प्रकरणाबाबत अत्यंत गंभीर आणि खळबळजनक विधाने केली आहेत. ईडीच्या एका जुन्या प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयात हजेरी लावल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी तपास यंत्रणांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, दिल्लीतून आलेल्या सूचनांचाही उल्लेख केला आहे.
रोहित पवार यांनी स्पष्ट केले की, ज्या प्रकरणासाठी त्यांची सत्र न्यायालयात हजेरी होती, त्याच प्रकरणात राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतरही काही बड्या नेत्यांचा समावेश आहे. हे संपूर्ण प्रकरण बँकेशी संबंधित व्यवहारांचे आहे. मुळात या प्रकरणाचा तपास करताना, कुठेही काहीही गैरव्यवहार झालेला नाही किंवा काही चुकीचे घडलेले नाही, अशी आमची सुरुवातीपासूनची भूमिका आहे. विशेष म्हणजे, राज्याच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) यापूर्वीच आपला तपास पूर्ण करून ईडीला स्पष्ट शब्दांत कळवले आहे की, ‘आमच्यासाठी हा विषय आता संपलेला आहे, यात काहीही तथ्य आढळलेले नाही.’ मात्र, ईओडब्ल्यूने ‘क्लोजर’ दिल्यानंतरही ईडी हा विषय सोडायला तयार नसल्याचे चित्र आहे. यामागील कारण सांगताना रोहित पवार यांनी दावा केला की, २६ जानेवारी रोजी या प्रकरणाशी संबंधित विषय दिल्लीला गेला होता. दिल्लीतून तपास यंत्रणांना स्पष्ट आदेश आले आहेत की, या प्रकरणात नाव असलेल्या नेत्यांना कोणालाही सोडायचे नाही. त्यामुळेच यंत्रणा पुन्हा सक्रिय झाल्या आहेत.
याचाच प्रत्यय नुकत्याच झालेल्या सुनावणीत आला. १३ तारखेला न्यायालयात यावर सुनावणी झाली असता, ईडीने थेट राज्य सरकारच्या भूमिकेविरोधात आपले म्हणणे मांडले. आम्हाला या विषयात अजून खोलात जाऊन सखोल तपास करायचा आहे, अशी भूमिका ईडीने न्यायालयासमोर घेतली आहे.
या सर्व घडामोडींवर भाष्य करताना रोहित पवार यांनी आपला लढण्याचा निर्धार व्यक्त केला. ते म्हणाले, “आम्हाला संघर्ष करायचा आहे आणि आम्ही त्यासाठी तयार आहोत. सत्य आमच्या बाजूने असल्याने, अंतिम विजय आमचाच होईल, हा आम्हाला ठाम विश्वास आहे.” त्याचवेळी त्यांनी सत्ताधारी पक्षात गेलेल्या नेत्यांनाही सूचक इशारा दिला आहे. “जे लोक सध्या सत्तेत आहेत आणि ज्यांची नावे या प्रकरणात आहेत, त्यांनी आपण यातून सुटलो आहोत या भ्रमात राहू नये. ‘कोड’ कधी कधी सुटत नाही, ईडीकडे त्यांचाही विषय प्रलंबित आहेच,” असे म्हणत त्यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.

