रत्नागिरी – लांजा येथे ११ वर्षीय शाळकरी मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणात रत्नागिरी सत्र न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
११ जुलै २०२३ रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना लांजा येथे घडली होती. पीडित मुलगी शाळा सुटल्यानंतर घरी जात असताना आरोपी आशितोष अनिल जाधव वय २०, रा. लांजा याने तिच्यासोबत असलेल्या दोन मुलांना धमकावून दूर पाठवले. त्यानंतर मुलीला जबरदस्तीने जवळील शासकीय उपकेंद्राच्या मागील बाजूस नेऊन तिच्यावर अत्याचार केला. घडलेला प्रकार कुणाला सांगितल्यास ठार मारण्याची धमकीही आरोपीने दिली होती.
घरी परतल्यानंतर मुलगी घाबरलेल्या अवस्थेत असल्याचे पालकांच्या लक्षात आले. नातेवाईकांनी विचारपूस केल्यानंतर तिने संपूर्ण घटना सांगितली. यानंतर तिच्या आईने लांजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६ (ए) (बी), ५०४, ५०६ तसेच पोक्सो कायद्याच्या कलम ४, ६, ८, ९ (एम), १० अन्वये गुन्हा नोंदवला. या प्रकरणाचा तपास तात्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक पी. व्ही. देशमुख यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्यादरम्यान सरकार पक्षाकडून एकूण ११ साक्षीदार तपासण्यात आले. पीडितेसोबत असलेल्या एका शाळकरी मुलाचीही महत्त्वाची साक्ष नोंदविण्यात आली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश अनिलकुमार अंबाळकर यांनी आरोपीला जन्मठेप व २२ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. सरकार पक्षातर्फे ॲड. अनुपमा ठाकूर यांनी काम पाहिले, तर न्यायालयीन पैरवीसाठी पोलीस कॉन्स्टेबल राजेश शिंदे यांनी सहकार्य केले.

