दरेगावात निसर्गोपचार केंद्रावरून राजकीय टोलेबाजी; उद्धव ठाकरेचा ‘मानसोपचार केंद्र’ म्हणत शिंदेंना टोला

0
3

मुंबई : राज्याच्या २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात सातारा जिल्ह्यातील दरेगाव येथे निसर्गोपचार केंद्र उभारण्याची घोषणा झाल्यानंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या निर्णयावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपहासात्मक टीका करत हे केंद्र म्हणजे “मानसोपचार केंद्र” असल्याचा टोला लगावला.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच २०२६-२७ चा अर्थसंकल्प सादर करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सातारा जिल्ह्यातील दरेगाव या मूळ गावी निसर्गोपचार केंद्र उभारण्याची घोषणा केली. या घोषणेनंतर विरोधकांकडून सरकारवर टीकेची झोड उठवण्यात आली.

प्रसारमाध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, एका विशिष्ट ठिकाणी उभारण्यात येणारे हे “मानसोपचार केंद्र” योग्य ठिकाणीच सुरू केले जात आहे. समाजातील सर्वांना अशा उपचारांची गरज नसते, पण काही जणांना त्याची आवश्यकता असते, असे म्हणत त्यांनी सरकारवर उपरोधिक टीका केली.

यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, या केंद्राच्या माध्यमातून निसर्गोपचारासोबत आवश्यक असल्यास मानसोपचारही केले जातील. विरोधकांच्या मनातील ताणतणाव दूर करण्यासाठीही या केंद्राचा उपयोग होईल, असा टोला त्यांनी लगावला.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी अर्थसंकल्पातील इतर घोषणांवरही प्रश्न उपस्थित केले. राज्यात ३०० कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट जाहीर करण्यात आले असले तरी त्यासाठी आवश्यक जमीन नेमकी कुठे उपलब्ध आहे, याचा खुलासा सरकारने करावा, अशी मागणी त्यांनी केली. विकास प्रकल्पांप्रमाणेच वृक्ष लागवडीच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनींवर आरक्षण आणले जाणार का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

रस्ते विकासाच्या कामांवर बोलताना त्यांनी सिमेंट रस्त्यांच्या मोठ्या प्रकल्पांवर शंका व्यक्त केली. मोठ्या प्रमाणावर सिमेंट खरेदी एकाच कंत्राटदाराच्या कंपन्यांकडून होत असल्याचा आरोप त्यांनी केला. राज्यात उभारण्यात येणाऱ्या मोठ्या रस्त्यांमुळे सर्वसामान्यांना नेमका काय फायदा होणार, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

राज्याच्या वाढत्या कर्जावरही त्यांनी चिंता व्यक्त केली. विविध योजनांसाठी लागणारा प्रचंड निधी सरकार कुठून आणणार आणि भविष्यात या कर्जाची परतफेड कोण करणार, असा सवाल करत त्यांनी सरकारच्या आर्थिक धोरणांवरही टीका केली.

दरम्यान, दरेगावातील निसर्गोपचार केंद्राच्या घोषणेवरून राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोपांचे वातावरण तापले आहे.