टी-२० विश्वचषक २०२६: न्यूझीलंडचा ९६ धावांनी धुव्वा उडवत सूर्यकुमारच्या टीम इंडियाची ऐतिहासिक सलग दुसऱ्यांदा जेतेपदावर मोहोर!

0
11

अहमदाबाद येथील जगातील भव्य अशा नरेंद्र मोदी स्टेडियमवर टीम इंडियाने दमदार खेळ करत न्यूझीलंडला ९६ धावांनी पराभूत केले आणि २०२६ च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या शानदार ट्रॉफीवर आपले नाव कोरले. सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वाखालील भारतीय धुरंधरांनी या विजयासोबतच एक मोठा सुवर्ण इतिहास रचला आहे. क्रिकेटच्या आतापर्यंतच्या इतिहासामध्ये सलग दोन वेळा टी-२० विश्वचषक जिंकणारा भारतीय संघ जगातील पहिला आणि एकमेव संघ ठरला आहे. इतकेच नाही तर, स्वतः यजमानपद भूषवत असताना ही प्रतिष्ठेची ट्रॉफी जिंकण्याचा जागतिक विक्रमही भारतीय संघानेच पहिल्यांदा आपल्या नावे केला आहे. या नेत्रदीपक विजयामुळे महान कर्णधार एमएस धोनी आणि हिटमॅन रोहित शर्मा यांच्या पंक्तीत जाऊन बसत सूर्यकुमार यादव हा भारताला टी-२० स्पर्धेत चॅम्पियन बनवणारा देशाचा तिसरा कर्णधार बनला आहे.

​या महत्त्वपूर्ण अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनर याने नाणेफेक जिंकून सुरुवातीला प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, भारताच्या आघाडीच्या बिनीच्या फलंदाजांनी आपल्या स्फोटक फलंदाजीने त्याचा हा निर्णय सुरुवातीपासूनच फोल ठरवला. मैदानात उतरलेल्या संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांनी अत्यंत तुफान फटकेबाजीचा नजराणा पेश करत न्यूझीलंडच्या सर्वच गोलंदाजांची अक्षरशः यथेच्छ धुलाई केली. त्यांच्या या झंझावाती खेळानंतर ईशान किशन याचाही उल्लेखनीय जलवा पाहायला मिळाला. डावाच्या अखेरच्या टप्प्यात शिवम दुबे याने आपल्या पॉवर हिटिंगच्या जोरावर धावांचा पाऊस पाडला. परिणामी, टीम इंडियाने निर्धारित २० षटकांत ५ विकेट्सच्या मोबदल्यात तब्बल २५५ धावांचा धावांचा डोंगर उभा केला आणि प्रतिस्पर्धी न्यूझीलंडसमोर विजयासाठी २५६ धावांचे विशाल टार्गेट सेट केले. भारतीय संघाने दिलेल्या या डोंगराएवढ्या धावसंख्येचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या संघाची पुरती दमछाक झाली. त्यांच्याकडून केवळ टिम सिफर्ट वगळता इतर कोणत्याही फलंदाजाला मैदानात तग धरून धमाकेदार खेळी करता आली नाही.

​यंदाच्या हंगामात सुरुवातीपासूनच टीम इंडिया जेतेपदाची सर्वात प्रबळ दावेदार मानली जात होती. सुपर ८ फेरीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या एकमेव पराभवामुळे भारतीय संघ ‘जर-तर’च्या समीकरणात अडकतो की काय, अशी अटीतटीची परिस्थिती निर्माण झाली होती. पण, ज्या मैदानातील पराभवामुळे संघाबाबत उलट-सुलट चर्चा रंगल्या होत्या, अगदी त्याच मैदानावर भारतीय संघाने न्यूझीलंडला नमवत ऐतिहासिक जेतेपद पटकावले आहे.

भारतीय खेळाडूंनी फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात दाखवलेली आक्रमकता त्यांच्या मानसिक कणखरतेची पावती देते. सूर्यकुमारच्या नेतृत्वाने युवा खेळाडूंना दिलेला आत्मविश्वासच या ऐतिहासिक आणि सलग दुसऱ्या विश्वविजेतेपदाचा खरा शिल्पकार ठरला आहे.