सिंधुदुर्गात खळबळ! बांधकाम व्यावसायिक सुशांत दळवी यांचा संशयास्पद मृत्यू, डोक्यात लागली बंदुकीची गोळी

0
2

कणकवली शहरात आज मोठी खळबळ उडाली असून येथील बांधकाम व्यावसायिक सुशांत दळवी यांचा मृतदेह गंभीर अवस्थेत येथील हरकुळ गावातील जंगलात आढळून आला आहे. त्यांच्या डोक्याला बंदुकीची गोळी लागली असून त्याचा घातपात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेने संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा हादरला आहे.

घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक मोहीम दहिकर यांनी तातडीने भेट देत संपूर्ण घटनेचा आढावा घेतला. त्यांच्या सोबत डीवायएसपी आढाव देखील उपस्थित होते. पोलिसांनी प्राथमिक तपासात मृतदेह सुमारे २५ ते ३० फूट फरफटत नेण्यात आल्याचे निष्पन्न केले आहे.

घटनास्थळी काही महत्त्वाचे पुरावे आढळून आले आहेत. दळवी यांची एक चप्पल झाडावर आढळली असून कच्च्या रस्त्यावर कारच्या टायरचे निशाण देखील दिसून आले आहेत. या सर्व बाबींमुळे हा प्रकार घातपाताचा असल्याचा संशय अधिक गडद झाला आहे.

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला असून आरोपींचा शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे कणकवली परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.