भारतीय रेल्वेने ऑनलाइन आरक्षण प्रक्रियेत मोठा बदल करत आजपासून (१ ऑक्टोबर २०२५) ई-तिकीट बुकिंगसाठी ‘आधार प्रमाणीकरण’ अनिवार्य केले आहे. IRCTC वेबसाइट आणि अॅपवरून साधारण आरक्षण खुलताच पहिले १५ मिनिटे तिकीट बुक करण्यासाठी प्रवाशांनी आपले खाते आधार क्रमांकाशी जोडणे आवश्यक असेल.
रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, या निर्णयाचा उद्देश दलाल, फेक अकाऊंट्स आणि बॉट्सद्वारे होणाऱ्या बोगस बुकिंगला आळा घालणे हा आहे. आरक्षण खुलल्यानंतरच्या पहिल्या पंधरा मिनिटांत फक्त आधार-प्रमाणित वापरकर्त्यांनाच तिकीट बुक करण्याची परवानगी दिली जाणार आहे. त्यानंतर इतर सर्व वापरकर्त्यांसाठी बुकिंग खुले राहील.
रेल्वेने याआधी टॅटकल तिकीट बुकिंगसाठीही आधार अनिवार्य केले होते. नवीन नियमामुळे सर्वसामान्य प्रवाशांना पारदर्शक आणि सुलभ तिकीट आरक्षणाचा लाभ होईल, असा विश्वास रेल्वे अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

