भाजपच्या ताब्यात असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेकडून माजी आमदार राजन तेली यांना धक्का मिळाला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची फसवणूक केल्या प्रकरणी राजन तेली यांच्यासह आठ जणांची दिल्ली येथील बँक सुरक्षा व फसवणूक विभागाकडून चौकशी होणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेकडून 2021 22 मध्ये राजन तेली यांनी कर्ज घेतलं होतं या कर्जाचा त्यांनी चुकीच्या पद्धतीने वापर केला अशा पद्धतीचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. राजन तेली यांच्यासह त्यांचा मुलगा प्रथमेश तेली, सर्वेस तेली तसेच रुजीता तेली यांच्यासह एकूण आठ जणांवर हा ठपका ठेवण्यात आला आहे. याबाबत जिल्हा बँकेने २२ सप्टेंबर 2025 रोजी तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे राजन तेली यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. राजन तेली हे भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष तसेच माजी आमदार राहिले आहेत. नारायण राणे यांचे ते कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात होते. मात्र नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी उद्धव ठाकरे शिवसेनेत प्रवेश करून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र त्या ठिकाणी ते पराभूत झाले होते. तेव्हापासून राजन तेली यांच्या अडचणी वाढल्या असून पराभूत झाल्यानंतर गेले काही महिने ते राजकारणापासून अज्ञात वासात गेले आहेत.

