मुंबई – महाराष्ट्रातील १२ जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गत असलेल्या १२५ पंचायत समित्यांच्या निवडणूक कार्यक्रमात राज्य निवडणूक आयोगाने बदल केला आहे. राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आल्याने ही निवडणूक दोन दिवस पुढे ढकलण्यात आली असून यामध्ये सुमारे ७ हजार उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
जिल्हा परिषदेच्या ७३१ जागांसाठी २ हजार ६२४ उमेदवार, तर पंचायत समित्यांच्या १ हजार ४६२ जागांसाठी ४ हजार ८१४ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. यामध्ये धाराशीव जिल्हा परिषदेत सर्वाधिक २९४ उमेदवार रिंगणात असल्याचे चित्र आहे.
राज्य निवडणूक आयोगाने रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशीव आणि लातूर या १२ जिल्ह्यांतील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी आधी ५ फेब्रुवारी रोजी मतदान आणि ७ फेब्रुवारीला मतमोजणी जाहीर केली होती. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे राज्य सरकारने तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला. या कालावधीत प्रचार थांबलेला असल्याने उमेदवारांना अतिरिक्त वेळ मिळावा, यासाठी आयोगाने उर्वरित निवडणूक टप्प्यांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला.
नवीन वेळापत्रकानुसार आता ७ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान होणार आहे. तर जाहीर प्रचाराची सांगता ५ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजता होईल. ९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता मतमोजणी सुरू होणार असून निकाल जाहीर झाल्यानंतर संबंधित ठिकाणची आदर्श आचारसंहिता समाप्त होईल. निवडून आलेल्या सदस्यांची नावे ११ फेब्रुवारीपर्यंत शासन राजपत्रात प्रसिद्ध केली जाणार आहेत.

