प्रदूषणकारी कंपन्यांना कोकणात थारा नाही; ‘लोटे’च्या त्या कारखान्यावर उपमुख्यमंत्री शिंदेंचा थेट प्रहार

0
5

खेड (रत्नागिरी): “कोकणच्या मातीवर, पाण्यावर आणि जनतेच्या श्वासावर घाला घालणाऱ्या प्रदूषणकारी उद्योगांना यापुढे कोकणात थारा मिळणार नाही. जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या कोणत्याही शक्तीला हे सरकार पाठीशी घालणार नाही,” अशा कडक शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चिपळूण-खेड पट्ट्यातील प्रदूषणकारी कंपन्यांविरोधात रणशिंग फुंकले. खेड येथे आयोजित भव्य सभेत ते बोलत होते.

इटलीतून हद्दपार झालेली ‘मितेनी’ कंपनी अप्रत्यक्षपणे ‘लक्ष्मी ऑरगॅनिक’ नावाने लोटे परशुराम एमआयडीसीत कार्यरत असल्याच्या तक्रारीची मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली. “विकासाच्या नावाखाली निसर्ग आणि लोकांचे आयुष्य धोक्यात घालणाऱ्या कंपन्यांविरोधात सरकार कठोर कारवाई करेल,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी चिपळूणमधील भूस्खलनग्रस्त भागांसाठी संरक्षण भिंत आणि कळवंडे धरणाच्या दुरुस्तीचा शब्दही जनतेला दिला.

कोकणच्या विकासासाठी मास्टरप्लॅन मांडताना शिंदेंनी मुंबई-गोवा ग्रीनफिल्ड रस्ता, कोकण विकास प्राधिकरण आणि ३० लाख कोटींच्या उद्योग करारांची माहिती दिली. “लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, ही योजना महिलांना आत्मनिर्भर करणारी आहे,” असे सांगत त्यांनी विरोधकांचे आरोप खोडून काढले.

सभेच्या सुरुवातीलाच त्यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अकाली निधनावर शोक व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली. “शिवसेनेचा जन्म मुंबईत असला तरी नाळ कोकणात आहे. या पक्षात कोणी मालक नाही, आपण सगळे कार्यकर्ते आहोत,” असा संदेश देत त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह भरला.