लोणावळा: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील आडोशी बोगद्याजवळ अपघातग्रस्त झालेल्या गॅस टँकरला हटवण्यात अखेर प्रशासनाला यश आले आहे. तब्बल ३२ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर गुरुवारी पहाटे दीड वाजता मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू झाली.
पुण्याकडून मुंबईकडे येणारा प्रॉपलिन गॅसचा टँकर चालकाचे नियंत्रण सुटल्याने उलटला होता. या अपघातामुळे टँकरला तीन ठिकाणी गळती लागली. वायू अतिज्वलनशील असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईकडे जाणारी मार्गिका तातडीने बंद करण्यात आली होती.
वाहतूक बंद केल्यामुळे बोरघाटात १० ते १५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सलग दोन दिवस प्रवासी अन्न-पाण्याविना अडकून पडल्याने संतापाचे वातावरण होते.
एनडीआरएफ, महामार्ग पोलीस, अग्निशमन दल आणि बीपीसीएलच्या तांत्रिक पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. टँकरमधील गॅस दुसऱ्या टँकरमध्ये उपसण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. स्फोट टाळण्यासाठी सातत्याने पाण्याचे फवारे मारले जात होते. अखेर पहाटे दीडच्या सुमारास टँकर बाजूला करण्यात आला आणि पहाटे तीन वाजेपर्यंत संपूर्ण घाट रस्ता कोंडीमुक्त झाला.

