चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल लागून तीन आठवडे उलटल्यानंतर अखेर येथील सत्तासंघर्षावर पडदा पडला असून अत्यंत नाट्यमय घडामोडींनंतर भाजपने महापालिकेवर आपला झेंडा फडकावला आहे. निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकूनही अंतर्गत गटबाजीमुळे काँग्रेसला सत्तेपासून दूर राहावे लागले आहे. काँग्रेसमध्ये खासदार प्रतिभा धानोरकर आणि आमदार विजय वडेट्टीवार यांच्या गटात महापौरपदावरून निर्माण झालेला वाद दिल्लीपर्यंत पोहोचला होता. हा तिढा सुटेपर्यंत स्थानिक राजकारणात मोठी उलथापालथ झाली आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने भाजपसोबत जाण्याचा अनपेक्षित निर्णय घेतल्याने काँग्रेसच्या हातातील सत्ता निसटली.
महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपच्या संगीता खांडेकर यांनी अवघ्या एका मताने विजय मिळवला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या संदीप गिऱ्हे यांच्या नेतृत्वातील गटाने भाजपला पाठिंबा दिल्याने हे शक्य झाले. सुरुवातीला काँग्रेससोबत चर्चेच्या फेऱ्या झाल्या होत्या, मात्र तिथे बोलणे फिस्कटल्याने ठाकरेंच्या शिवसेनेने स्थानिक पातळीवर भाजपशी हातमिळवणी करण्याचा निर्णय घेतला. या नव्या युतीमुळे चंद्रपूर महापालिकेत आता सत्तेचे नवे समीकरण आकारास आले आहे.
ठरलेल्या नव्या फॉर्म्युल्यानुसार, भाजप आणि ठाकरेंची शिवसेना महापौरपद प्रत्येकी सव्वा-सव्वा वर्षांच्या दोन टर्ममध्ये वाटून घेणार आहेत. याशिवाय, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रशांत दानव यांची पाच वर्षांसाठी उपमहापौर म्हणून वर्णी लागली आहे. सत्तेच्या या वाटपामध्ये स्थायी समितीचे अध्यक्षपद पहिल्या आणि चौथ्या वर्षासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडे राहणार असल्याचे निश्चित झाले आहे. या राजकीय घडामोडींमुळे चंद्रपूरच्या राजकारणात काँग्रेसला मोठा धक्का बसल्याची चर्चा रंगली आहे.

