शरद पवार यांच्या प्रकृतीत सुधारणा; रुबी हॉल क्लिनिकचा दिलासादायक अहवाल

0
5

पुणे येथील रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार घेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रकृतीत आता चांगली सुधारणा होत आहे. रुग्णालयाचे फिजिशियन व विश्वस्त डॉ. सायमन ग्रँट यांनी दिलेल्या माहितीनुसार, पवार यांचे सर्व ‘व्हायटल पॅरामिटर्स’ सामान्य असून त्यांची प्रकृती सध्या पूर्णपणे स्थिर आहे.

सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, तातडीने सुरू करण्यात आलेल्या उपचारामुळे त्यांना जाणवणारा त्रास आता लक्षणीयरीत्या कमी झाला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले असून, रुग्णालयाच्या ठराविक वैद्यकीय प्रोटोकॉलनुसार त्यांच्या नियमित तपासण्या केल्या जात आहेत. त्यांच्या प्रकृतीतील प्रगती पाहूनच पुढील उपचारांबाबतचा निर्णय घेतला जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी समर्थकांनी रुग्णालयाबाहेर गर्दी करू नये, असे आवाहन रुबी हॉल क्लिनिक प्रशासनाकडून करण्यात आले आहे. रुग्णालयातील इतर रुग्णांच्या सेवेत आणि कामकाजात कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन पक्ष कार्यकर्ते व हितचिंतकांना करण्यात आले आहे.